संग्रहित छायाचित्र
श्रीवर्धन प्रतिनिधी
दिघी पोर्टमधून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दिघी रस्त्याची दुरवस्था झाली आहे . वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याने रस्त्यात पूर्णपणे खड्डे पडले आहेत . मुरुड जंजिरा , अलिबाग या ठिकाणी जाण्याचा हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर सतत वर्दळ असते ; परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे . या मार्गावरील खड्यांमध्ये चक्क लाल माती टाकून त्यांची डागडुजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाने केला आहे .
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात होणाऱ्या दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्गाला राज्य मार्गाचा दर्जा मिळाला आहे . या मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे . त्यातील पहिला टप्पा दिघी माणगाव ५५ किलोमीटरचा आहे. त्यातील ६० टक्के काम जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे ; परंतु वेळास ते दिघी या ७ किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे . त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे . श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनाला वाव मिळत आहे . त्यामुळे लाखो पर्यटक श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनाला येत असतात ; परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे . त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे . याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा त्यावर फक्त आश्वासने देण्यात आली आहेत . आता खड्डयांमध्ये चक्क लाल माती टाकून त्यांची डागडुजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाने केला आहे . खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली लाल माती बाहेर येऊन रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे .
إرسال تعليق