क्यार ' सरकले . . . श्रीवर्धनकरांचासुटकेचा निःश्वास

चक्रीवादळाचा प्रभाव अत्यल्प ; मात्र उधाणाचा किनारपट्टीला फटका 

श्रीवर्धन प्रतिनिधी
 बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झाले होते . परंतु हे चक्रीवादळ गोवा , सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर थैमान घातल्यानंतर पाकिस्तान व ओमानच्या दिशेने सरकले . त्यामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्याला फारसा फटका बसला नाही . परंतु , किनारपट्टीला उधाणाच्या पाण्याचा तडाखा बसला आहे . शनिवारी ( दि . २६ ) दुपारच्या वेळेला जवळजवळ एक तास जोरदार वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाली . मात्र त्यानंतर वातावरणात बदल होऊन पाऊसदेखील थांबला आणि वारादेखील थांबला होता . चक्रीवादळ ईशान्य दिशेला सरकले नसते तर रत्नागिरी , रायगडसह मुंबईला व ठाणे , पालघर जिल्ह्याला या चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसला असता . मात्र चक्रीवादळाबाबत अनेक अफवा उठल्यानंतर श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर त्याचप्रमाणे तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे येणाऱ्या पर्यटकांनी येण्याचे टाळले . दिवाळीची सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटकांनी आपल्याला फिरायला जाण्यासाठी श्रीवर्धन , दिवेआगर , हरिहरेश्वर याठिकाणी जाण्याचा बेत आखला होता . परंतु दूरदर्शन त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप , फेसबुक व यू - ट्यूब चॅनलवर वादळाबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्यामुळे अनेकांनी आपले बुकींग रद्द केले . त्यामुळे आलेल्या चक्रीवादळाचा फटका परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे . चक्रीवादळाचा तडाखा जरी याठिकाणी अत्यल्प प्रमाणात बसला असला तरीही उधाणाच्या पाण्याने मात्र अनेक ठिकाणी किनारे उद्ध्वस्त केले आहेत . श्रीवर्धन दांडे त्याचप्रमाणे खालचा जीवना व श्रीवर्धन समुद्रकिनारी उधाणाचे पाणी भात शेतीमध्ये घुसल्याने भात शेती नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे . तसेच समुद्रावर बांधलेल्या धूप प्रतिबंधक बंधाराच्या खालूनदेखील लाटांचे पाणी समुद्रकिनाऱ्याच्या बाहेर आलेले पाहायला मिळत होते . रविवारी ( दि . २७ ) सायंकाळी अमावस्या सुरु होत असल्यामुळे उधाण अजून वाढण्याची शक्यता होती . परंतु सकाळपासून वातावरण स्वच्छ असून ऊन पडल्यामुळे नागरिकांना दिवाळीचा पहिला सण उत्साहात साजरा करता आला . एकूणच चक्रीवादळ ईशान्य दिशेला सरकल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा