दिघी पोर्ट ची अवजड वाहतूक उठली म्हसळा शहरवासीयांच्या जीवावर



दिघी पोर्ट ची अवजड वाहतूक उठली म्हसळा शहरवासीयांच्या जीवावर , कॉइल वाहतूक करणारा भरधाव ट्रेला दुकान इमारतीतील दुकान गाळ्यांमध्ये घुसला, पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला 
म्हसळा : सुशील यादव 

गेल्या १० – १२ वर्षांपासून दिघी पोर्ट ची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून धोकादायक रित्या सुरु आहे. याचाच प्रत्यय मंगळवारी (१७ सप्टें) म्हसळा शहरवासियांना आला. सकाळी ४.४५ च्या सुमारास एक लोखंडी कॉइल वाहतूक करणारा ट्रेला ( क्रमांक एम्.एच. ४६ बी.एफ. ५३१९ ) भरधाव वेगाने नवानगर येथील एका इमारती च्या दुकान गाळ्यांमध्ये घुसला. अपघाताची वेळ हि पहाटेची असल्याने सदर दुकाने हि बंद होती त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिघी पोर्ट येथून पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी , विळे-भागाड, माणगाव येथे गेले अनेक वर्षे नियमित लोखंडी कॉइल घेऊन जाणाऱ्या जवळ जवळ २०० – २५० ट्रेला ची वाहतूक रोज सुरु आहे. त्यातीलच एक ट्रेला काल पहाटे ४.४५ च्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने नवानगर येथील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या  आतिक खतीब यांच्या इमारतीतील शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील व सिराज मुसा यांच्या दुकान गाळ्यासमोर असलेले गटार व पत्रा शेड तोडून धडकल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघाताची वेळ हि पहाटेची असल्याने दुकान मालाकांसाहित कोणतीही व्यक्ति अपघातसमयी हजर न्हवती. अपघात घडताच ट्रेला चालकाने मात्र त्वरित घटना स्थळावरून पळ काढला. त्यामुळे मोठी जीवित हानी टाळली. घटनेची माहिती मिळताच म्हसळा नवानगर येथील नागरिक घटनास्थळी जमा होऊन या अवजड वाहतुकी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यावेळी या ट्रेला तसेच टँकरची लांबच लांब रांग दिघी रस्ता ते श्रीवर्धन रस्त्यापर्यंत लागली होती. यामुळे वाहतूक कोंडी साठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या म्हसळा शहरात भल्या पहाटेच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळातच पोलीसही घटनास्थळी हजर झाले व शेवटी म्हसळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी संतापलेल्या नागरिकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली.या अपघातां संदर्भात संबधित ट्रेला चालकावर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. या आधी म्हसळा तालूक्यातील खरसई गावाच्या हद्दीतील एका घरात असाच लोखंडी कॉइल घेऊन जाणारा ट्रेला घुसून घराचे नुकसान झाले होते त्यावेेळीही सुदैवाने सदर घरातील व्यक्तींंना किरकोळ दुखापत झाली होती.


 पहाटे ४.४५ च्या सुमारास मला एखादा स्फोट व्हावा असा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. मी रहात असलेल्या घराच्या बाजूच्या इमारतीला लोखंडी  कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलाने धडक दिली असल्याचे माझ्या निदर्शनास आले. हा आवाज इतका मोठा होता की नवानगर येथील अनेक नागरिक त्वरित घटना स्थळी काय घडले हे पाहण्यासाठी जमा झाले. या घटनेमुळे माझे कुटुंब तसेच शेजारी प्रचंड भयभीत झाले आहेत. ट्रेला जर थोडा पुढे आला असता तर थेट माझ्या घरातच घुसला असता आणि मोठा अनर्थ झाला असता.
अपघाताचे प्रत्यक्षदर्शी नवीद जंजीरकर,नवानगर, म्हसळा 


म्हसळा शहरातून हि अवजड वाहतूक बंद व्हावी यासाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा विनवणी केली आहे. याआधी दिघी पोर्ट मधून २५ - २८ टन वजनाची लोखंडी कॉईल तसेच कोळसा येत असे परंतु गेल्या काही महिन्यात इथॅॅनॉल सारखा प्रचंड ज्वलनशील द्रवपदार्थाची देखील वाहतूक होत आहे. लोखंडी कॉईंंल च्या ट्रेला च्या धडकेत या इमारतीचे नुकसान झाले आहेच परंतु जर इथॅॅनॉल ने भरलेला टँकर धडकला असता तर आग लागून यापेेक्षाही भयंकर परिस्थीती निर्माण झाली असती. म्हसळा नगरपंचायती कडे अद्यापअग्निक्षामक यंत्रणा उपलब्ध नाही तसेच दिघी पोर्ट ने देखील शहराजवळ कोणत्याही प्रकारची अग्निक्षामक यंत्रणेची व्यवस्था केलेली नाही मग हे ज्वलनशील पदार्थाची वाहतूक दिघी पोर्ट कोणत्या नियमाने करीत आहे ते दिघी पोर्ट प्रशासनाने सांगावे. व हि दिघी पोर्ट ची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून त्वरित बंद करावी अन्यथा आम्ही शहरवासीय स्वतः दिघी पोर्ट चा एकही ट्रेला किंवा टँकर म्हसळा शहरातून जाऊ देणार नाही.
मुसद्दिक़ इनामदार , सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा