श्रीवर्धनच्या दळणवळणावर दीर्घकालीन परिणामाचा संभव
; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
या वर्षी झालेल्या जोरदार पावसाने सार्वजनिक बांधकाम खात्याची अकार्यक्षमता दिसून आली आहे .श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट धोकादायक स्थितीत पोहचला आहे .त्याचे परिणाम दळणवळण व पर्यटनावर होण्याचा संभव आहे.त्यामुळे वाहन चालक व श्रीवर्धन मधील जनता यांच्या कडून संताप व्यक्त केला जात आहे .
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक अपघाताचा केंद्रबिंदू असलेल्या बोडणी घाटा कडे सार्वजनिक बांधकाम खात्याने सदैव दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .ऑगस्ट महिन्यात चार दिवस झालेल्या जोरदार पाऊसाने बोडणी घाटातील वळण रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे .वळण रस्त्याच्या डाव्या बाजूला अंदाजे 20 ते 25 फुटाच्या जवळपास खोल दरी आहे .खचत असलेल्या रस्त्यावर बांधकाम खात्याने सहा जवळपास एक फूट उंचीचे रिफलेक्टर लावले आहेत .परंतु त्याचा अपघात रोखण्यासाठी उपयोग होण्याची शक्यता कमीच आहे .कारण म्हसळया कडून येणार वाहन चालक तीव्र उतार उतरत असतो त्याला पुढील वळण रस्त्याचा कल्पना नसते . बोडणी घाटाची रचना प्रथम दर्शनी अतिशय सोपी वाटते परंतु त्यामुळे सदरच्या मार्गावर नव्याने येणाऱ्या वाहन चालकांला वेगाचा अंदाज येत नाही त्याची परिणीती गेल्या दोन वर्षात असंख्य अपघातात झाली आहे . .माणगाव , साई , म्हसळा मार्गे श्रीवर्धन कडे येतांना 48किमी व माणगाव , गोरेगाव , खामगाव , म्हसळा मार्गे श्रीवर्धन किमी चे 56 किमी अंतर आहे .सदर चा रस्ता हा पूर्णपणे घाट रस्ता आहे .श्रीवर्धन शहरात प्रवेश करण्यासाठी बोडणी घाटा शिवाय दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नाही .म्हसळा , वाडांबा ,जांभुळ , वडघर , बोडणी मार्गे श्रीवर्धन हा एकमेव मार्ग आहे . वडघर ते बोडणी 5 किमी अंतर आहे त्यात तीव्र उतार व वळण रस्ता आहे .म्हसळा कडून श्रीवर्धन कडे जाताना बोडणी घाटात डाव्या बाजूला वळून जावे लागते बोडणी घाटातील एक रस्ता मेघरे कडे जातो व दुसरा श्रीवर्धन कडे जातो .वाहन चालकास सर्व प्रथम मेघरे रस्ता निदर्शनांस येतो . बोडणी घाटात रस्त्याच्या कडेला मोठे वडाचे झाड आहे .पावसाळ्या पूर्वी बांधकाम खात्याने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे अपेक्षित होते परंतु त्यांना त्याचा विसर पडलेला दिसून येत आहे .त्या कारणे रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या वाहन चालवताना चालकांना त्रासदायक ठरत आहेत .
बोडणी घाट हा अपघात प्रवण क्षेत्र आहे . बोडणी रस्त्याची रुंदी जवळपास 17 फुटाची आहे . बोडणी घाटातून मुंबई व इतर उपमहानगरा कडील श्रीवर्धन शहराची सर्व वाहतुक चालते .राज्यातील सर्व पर्यटक याच घाटातून श्रीवर्धन शहरात प्रवेश करतात .श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे , बापवली ,गुलदे , निरंजनवाडी या ग्रामीण भागातील वाहतुक बोडणी घाटातून निरंतर चालते .
पावसामुळे बोडणी घाटातील वळण रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीच्या बाजूने रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे .आगामी काळात निरंतर पाऊस झाल्यास सर्व रस्ता खचू शकतो .त्यासाठी तात्काळ प्रतिबंधक उपाय योजना करण्याचे अगत्याचे आहे .रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे .तसेच दरीच्या बाजूला भिंत बांधणे शक्य झाले नाही तर किमान चार फुटाच्या जवळपास उंच कठडे बांधणे आवश्यक आहे .कारण तीव्र उतार उतरणाऱ्या वाहन चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्यास किंवा पावसाळी वाहन स्लिप झाल्यास कमीत कमी लगत च्या दरीत कोसळणार नाही .व प्राणांतिक अपघात टळू शकतो .
श्रीवर्धन तालुक्यात ऑगस्ट महिन्या नंतर पर्यटकांची गर्दी वाढते .पर्यटन हा श्रीवर्धन मधील उभारी घेणारा व्यवसाय आहे .श्रीवर्धन तालुक्यातील असंख्य लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून आजमितीस रोजगार उपलब्ध होत आहे .बोडणी घाट तात्काळ दुरुस्त होणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम श्रीवर्धन मधील पर्यटनावर होण्याची दाट शक्यता आहे ........वसंत यादव (पर्यटन सभापती श्रीवर्धन नगरपरिषद )
श्रीवर्धन आगाराच्या सर्व बसेस मुंबई कडे मार्गक्रमण करतांना बोडणी घाटातून जातात .प्रवाशी सुरक्षेला एस टी ने सदैव प्राधान्य दिले आहे .बोडणी घाटातील वळण रस्ता खचतोय अशी तक्रार कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी ने केली आहे .तरी सर्व चालकांना रस्त्याची परिस्थिती बघून पुढे मार्गस्थ होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ......शर्वरी लांजेकर ( स्थानक प्रमुख एस टी आगार श्रीवर्धन )
आम्हांला दररोज बोडणी घाटातून जावे लागते .बोडणी घाटातील तीव्र उतार धोकादायक आहे .आता बोडणी रस्ता खचतोय त्यामुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते .....संदीप गुरव ( एस टी कामगार सेना सचिव श्रीवर्धन )
बोडणी घाट वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे .श्रीवर्धन ते म्हसळा विक्रम रिक्षा निरंतर बोडणी रस्त्यावरून प्रवाशी वाहतुक करतात .बोडणी घाट खचण्यास सुरुवात झाली आहे ही बाब अतिशय धोकादायक असून प्रवाशी वाहतुक करणाऱ्या आमच्या लोकांच्या दृष्टीने निश्चितच रोजगारा वर परिणाम करणारी आहे व बोडणी घाट लवकरात लवकर दुरूस्त करण्यात आला नाही तर त्यामुळे प्राणांतिक अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते .सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ घाटाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे .....अविनाश कोळंबेकर (अध्यक्ष विक्रम रिक्षा संघटना श्रीवर्धन )
बोडणी घाटात 10 मीटर रस्ता खचला आहे .अपघात प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत .सदर रस्त्याच्या कामाची ई निविदा प्रक्रिया सुरू आहे .पाऊस कमी झाल्या नंतर तात्काळ खचलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल ....... श्रीकांत गनगणे (अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते श्रीवर्धन )




إرسال تعليق