म्हसळा शाळा नं.१ वर अखेर नगरपंचायतीचा हातोडा पडणार


म्हसळा शाळा नं.१ वर अखेर नगरपंचायतीचा हातोडा पडणार : नगराध्यक्षांचा दुजोरा नगर पंचायतीचे इमारतीसाठी होणार जागेचा वापर

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहर नगर पंचायत हद्दीतील म्हसळा शाळा नं.१ च्या जागेत नगरपंचायतीची भव्य प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजुर असल्याचे म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फलक नाझ हुर्जुक यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले.नगरपंचायतीने सदरची जागा सिटी सर्वे कडून मोजून घेतली .अतीशय अनुभवी वास्तुविशारदा कडून इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाइन करण्यात येणार आहे. इमारतीसाठी रु ५२५ लक्ष इतका निधी उपलब्धआहे असे हुर्जुक यानी सांगितले.
सुमारे ९ गुंढे क्षेत्र असणाऱ्या या जागेत सद्यस्थितीत म्हसळा शाळा नं १ चा इयत्ता ४ थीचा वर्ग , कार्यालय व केंद्रीय शाळा अशा इमारती आहेत. असणारी मुख्य इमारतीची वास्तू ही सन १८७४ ची म्हणजे सुमारे १४५ वर्षापूर्वीची चुन्यातील व दगडी बांधकामाची ऐतीहासीक वास्तू आसल्याचा दावा स्थानिक नागरीकांचा आहे.जंजीरा संस्थानचा कासीम खान नंतरचा नबाब अहमदखानहा १८७० च्या दरम्यान गादीवर बसल्यावर संस्थानची योग्य ती प्रगती होण्याचे दृष्टीकोनातून शिक्षण, आरोग्य व दळण वळणाची साधने असावी यावर लक्ष केंद्रीत करून सदरची इमारत त्याचे काळात बांधण्यात आली. ती सन १८७४ मध्ये वापरांत सुरु झाली. यावेळी हिंदू व मुस्लीम विद्यार्थी एकत्र शिकत असत. संस्थानाचे दप्तर , प्रशासकीय बाबीवर व नबाबा जवळ विशेष जवळीक आसल्याने शाळेचे हेड मास्तरांची जबाबदारी सी.के.पी. समाजातील कर्णिक मास्तरांवर व उर्दू शिकविण्याची मुख्य जबाबदारी काजी मास्तरांवर होती.
ही इमारत पुरातन वास्तू आसल्याचा दावा शहरातील गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के, सुशिल यादव, अरुण उर्फ बाळा जंगम, वैभव कळस, सुरेश कुडेकर, समीर करडे , अनिकेत पानसरे, गणेश हेगीष्टे, कौस्तुभ करडे, चेतनदादा जैन, निलेश करडे, समीर लांजेकर, मयुर ढवळे, राहुल जैन व अन्य काही मंडळीचा आहे. ही वास्तू ऐतिहासिक ,पुरातन वास्तू आसल्याने ती पाडण्यापेक्षा तीचे जतन व तेवढयाच उच्च कामासाठी वापर होणे किंवा तेथेच शाळा असणे हे महत्त्वाचे असल्याचा भावनात्मक दावा संबधीतांचा आहे.

"रायगड जिल्हा परिषदेच्या इमारत नगरपंचायतीकडे वर्ग करावी असा प्रस्ताव आम्ही जिल्हा परीषदेकडे पाठविला आहे तो मंजुर आहे,म्हसळा शाळा नं.१ची इमारत हस्तांतर होताना विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही "
संजय कर्णिक, उप-नगराध्यक्ष,म्हसळा नगर पंचायत.


"म्हसळा नगर पंचायत हद्दीत रायगड जिल्हा परिषदेच्या म्हसळा शाळा नं. १, म्हसळा उर्दु, आदीवासी वाडी, सावर व चिराठी अशा ५ शाळा, २७५ विद्यार्थी व १२ शिक्षक कार्यरत आहेत. कोणत्याही शाळेचा हस्तांतरणाबाबतचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही."
संतोष शेडगे, (प्र.)गट शिक्षण अधिकारी. पं.स. म्हसळा.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा