खासदार श्री. सुनील तटकरेंनी घेतली कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालकांची भेट : रेल्वे समस्यांवर चर्चा



शपथविधी होण्याआधीच कामाचा धडाका सुरू : कोकण रेल्वेच्या विविध समस्यां तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चेसाठी खासदार श्री. सुनील तटकरेंनी घेतली कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट

कीशोर  धोकटे :  कणघर 
रायगड लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कोकण रेल्वेच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले होते. कार्यतत्पर अशी ओळख असणाऱ्या तटकरे यांनी खासदारकीचा शपथविधी होण्याआधीच कामाचा धडाका सुरू केला आहे.

कोकण रेल्वेच्या समस्या तसेच अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी रेल्वेतील सुरक्षा, खेड दिवाणखवटी तसेच कोलाड येथील प्लॅटफाॅर्म्सची उंची वाढवणे, रत्नागिरीतील शिरवली स्थानकावर रेल्वे क्राॅसिंगसाठी ओव्हर ब्रीज बांधणे तसेच गणेशोत्सवासाठी विशेष गाडी सुरू करणे त्यांचे योग्य नियोजन करणे याबाबतच्या मागण्या त्यांनी समोर ठेवल्या व त्यावर दीर्घ चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात सामावून घेण्याच्या विषयावरही चर्चा झाली. 

त्याचसोबत पनवेल-चिपळूण इएमओ रेल्वे सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. खेड रेल्वे स्थानकात महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा याबाबतीत आग्रही भूमिका घेऊन तसे निवेदन कोकण रेल्वेकडे सुपूर्द केले असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. कोकण रेल्वेनेही याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यासाठी तत्त्वतः मंजूरी दर्शवली आहे. मी देखील याविषयी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून, त्याबाबत पाठपुरावा करून हे विषय लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे, असा विश्वास तटकरे यांनी कोकणवासियांना दिला आहे. वरील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे व कोकण रेल्वे यांची संयुक्त बैठक उद्या दि. १४ जून रोजी मुंबई येथे होणार असून या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा