श्रीवर्धनवरुन युतीत बेबनाव ? मतांच्या पिछाडीमुळे भाजप , शिवसेनेचे परस्परावर खापर


श्रीवर्धनवरुन युतीत बेबनाव ?
मतांच्या पिछाडीमुळे भाजप , शिवसेनेचे परस्परावर खापर

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मोदी त्सुनामीत महाराष्ट्रासह देशभरात विरोधकांचा पाळापाचोळा झाला असताना कोणत्याही लाटेवर स्वार न होण्याची परंपरा रायगड लोकसभा मतदारसंघाने यंदाही राखली. भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यातील लढतीत श्रीवर्धनमधील मते निर्णायक ठरली. तटकरे यांनी येथूनच बाजी मारल्याचे बोलले जाते. यावरून भाजप आणि शिवसेनेच्या चिंतन बैठकीत परस्परांवर खापर फोडण्यात येऊन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघावर आपापला दावा करण्यात आला . त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात बेबनाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत . 

रायगड लोकसभेसह श्रीवर्धन विधानसभेसाठी भाजप आग्रही 
रायगड लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार, शिवसेना नेते अनंत गीते यांच्या पराभवानंतर म्हसळ्यात भाजपची चिंतन बैठक नुकतीच झाली. या वेळी पराभवाची कारणीमिमांसा करण्यात आली . गावागावात शिवसेनेबाबत असलेली नाराजी , नियोजन व समन्वयाचा अभाव यामुळे अपयश आले आहे . त्यामुळे भविष्यात हा मतदारसंघ परिवर्तन म्हणून आपण लढवावा व शिवसेना नेतृत्वाने त्याला साथ द्यावी, असा सूर या वेळी भाजपचे सर्व तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिका-यांनी लावला . त्याचप्रमाणे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघही यंदा भाजपच्या वाट्याला यावा, असा ठराव करण्यात आला. म्हसळ्यातील सार्वजनिक नगर वाचनालयात ही चिंतन बैठक झाली . या बैठकीस भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक , युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग , श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे , म्हसळा तालुका अध्यक्ष शैलेश पटेल , माणगाव तालुका अध्यक्ष संजय ढवळे , तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे , रोहा तालुका सरचिटणीस संजय लोटणकर आदी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते . रायगड लोकसभा मतदारसंघात विजय संपादन करायचा असल्यास येथे पक्षनेतृत्वाने योग्य तो निर्णय देऊन आम्हाला परिवर्तन करण्याची संधी द्यावी , असे मत भाजपचे तालुका अध्यक्ष व अन्य पदाधिका - यांनी व्यक्त केले . 


"श्रीवर्धन" आमच्याकडेच राहणार : शिवसेना 
रायगड लोकसभेसह श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आम्हाला द्या , अशी मागणी भाजपने केली असताना , श्रीवर्धन मतदारसंघ शिवसेना सोडणार नाही , असा ठराव या पक्षाच्या चिंतन सभेत करण्यात आला . त्यामुळे यावरून भाजप शिवसेनेत येत्या काळात तू तू मै मै होण्याची शक्यता आहे . श्रीवर्धन शिवसेना पदाधिका - यांची चिंतन सभा शहरातील कुणबी समाज भवनात आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये केंद्रीय मंत्री व उमेदवार अनंत गीते यांच्या पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे देण्याचे ठरले . पराजयाची सर्वांनाच खंत असून , यासंदर्भात संघटनेचे पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पराभवाचे चिंतन करताना शिवसेना - भाजप युती असताना श्रीवर्धन मतदारसंघातील भाजपच्या मतांची आकडेवारी का मिळू शकली नाही ? प्रचारामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी कसूर का केला ? असे प्रश्न उपस्थित करून श्रीवर्धन भाजपच्या ताब्यात ठेवता यावा यासाठीच लोकसभा उमेदवाराची प्रचंड मतांनी पिछेहाट करण्यात आली , असा आरोप शिवसेना पदाधिका - यांनी केला . कोणत्याही परिस्थितीत श्रीवर्धन मतदारसंघ शिवसेना सोडणार नाही व याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले . या सभेला माजी आमदार तुकाराम सुर्वे , तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर , सुरेश पाटील , सुरेश मांडवकर , बाबुराव चोरगे , मिना गाणेकर , अरुण शिगवण , राजू चव्हाण , रत्नाकर लांबाडे , रवि चोगले , जगन चाळके , मारूती विचारे , दीक्षा टाकळे , अंतिमा पडवळ , सौ . माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा