श्रीवर्धन : आनंद जोशी
लोकसभा निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या . केंद्र सरकारही बनले. लोकसभा निवडणुकांबाबतचे कवित्व अजून काही महिने सुरु राहील . परंतु आता महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आल्याने काही महिन्यातच त्या निवडणुका होतील , त्या दृष्टीने आता पूर्व - तयारीला म्हणजे शेतीच्या भाषेत बोलायचे झाले तर पेरणी आणि मशागतीला ठिकठिकाणी सुरुवात झाल्याचे दिसते . त्या दृष्टीने चालू असलेल्या विकास कामांचा आढावा घेणे , आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूर कामे सुरु करुन घेणे , वेगवेगळ्या निमित्तांनी मतदारांसमोर येणे इ . गोष्टींना सुरुवात झाल्याचे ठिकठिकाणी दिसते . एकेका पुलाचे श्रेय घेण्यासाठी तीन - तीन राजकीय पक्षांत अहमहमिका लागल्याचेही प्रसार माध्यमांच्या बातम्यांवरुन समजते . १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघही याला अपवाद नाही . २००९ च्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार श्री . सुनिल तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले होते . ते सत्ताधारी पक्षांत असतांना व त्यानंतर विरोधी पक्षांत असतांनाही त्यांनी मतदार संघात विविध शासकीय योजनांमधून करोडो रुपयांची विकास कामे प्रत्यक्षांत करुन दाखवून तुफान लोकप्रियता मिळविली . हे त्यांचे कौशल्य असल्याचे सर्वच लोक मान्य करतात . त्यांचेवरोवर त्यांचे विधान परिषदेवर असलेले चिरंजीव आ . अनिकेत तटकरे व रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असलेल्या त्यांच्या कन्या कु. आदिती तटकरे या दोघांनीही या मतदार संघाशी सतत संपर्क ठेवून आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना व भाजपा , या पक्षांची युती नसल्यामुळे शिवसेनेतर्फे श्री . रवि मुंढे , भाजपा तर्फे श्री . कृष्णा कोबनाक व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्री . अवधूत तटकरे हे प्रमुख उमेदवार होते. आणि अर्थातच सेना भाजप च्या मतविभागणीमुळे श्री . अवधूत तटकरे हे श्री . मुंढे यांच्यापेक्षा अल्प मते जास्त मिळून त्यांचा निसटता विजय झाला होता . मात्रा आता परिस्थिती बदलली आहे . लोकसभा निवडणुकांना भाजपा - शिवसेना व मित्रपक्षांची महायुती होती व त्यास घवघवीत यशही मिळाले . तशीच महायुती विधान सभेसाठी टिकून राहिली तर शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षांतर्फे एकच उमेदवार असणार हे निश्चितच , परंतु युती यदाकदाचित झाली नाही तर या दोन्हीही पक्षांतर्फे उमेदवार हे सांगायला कोणी ज्योतिषी नको , राष्ट्रीय काँग्रेसचे या मतदार संघात आता फारसे अस्तित्व टिकून न राहिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हाच प्रमुख पक्ष शिल्लक राहिला . या पक्षाच्या माध्यमातून खा . सुनिल तटकरे यांनी व आ . अनिकेत तटकरे आणि कु . आदिती तटकरे यांचा सततचा संपर्क आणि त्यांनी केलेली असंख्य विकास कामे या पुण्या - ईवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारकीसाठी फक्त आदिती तटकरे यांचेच नाव सर्वत्र चर्चेत आहे . आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शीर्षकात निवडणुकीची पेरणी हा शब्दप्रयोग वापरला आहे त्याचे कारण की भाजपा नेते श्री . कृष्णा कोबनाक यांच्या व शिवसेनेचे माजी खासदार श्री . अनंत गीते यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसांचे मोठाले शुभेच्छा फलक मतदार संघात अनेकठिकाणी लावलेले दिसतात , जे गेल्या ४ वर्षात एवढ्या मोठ्या संख्येने क्वचितच पहायला मिळाल्याचे नागरिकांकडून ऐकू आले . गीते यांच्या शुभेच्छा फलकांवर रोहा तालुका शिवसेना प्रमुख श्री . समीर शेडगे यांचे नाव व फोटोही आहे . त्यामुळे या फलकांचा संबंध आगामी विधानसभा निवडणुकांशी असावा अशी चर्चा मतदारांमध्ये ऐकू येते . याशिवाय विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरील नावांव्यतिरिक्त आणखीही काही इच्छुक असल्याचीही कुणकुण अनधिकृतपणे ऐकू येते . फक्त ती नावे उघड करायला अजून उघडपणे कोणी तयार नाही असे दिसते . बघू या या पेरणीतून काय उगवते ते .

إرسال تعليق