महाराष्ट्र राज्य परिवहन स्थापना दिनानिमित्त एक अनोखी कहाणी तिची अन् त्याच्या प्रेमाची


कथा माझ्या पहिल्या प्रेमाची...आजपर्यंत कधीच कोणालाही न सांगितलेल्या माझ्या खर्या प्रेमाची...

 श्री.मिठ्ठू (राहुल) त्रिंबक आंधळे, एस.टी.वाहक श्रीवर्धन आगार

आज तिचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात तिचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.ती म्हणजे कोण तर माझी प्रिय प्रियेशी... आज तिच्या संदर्भात काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार तिच्या संदर्भात कितीही सांगितले तरीसुद्धा कमीच पडणार आहे...

 तशी तिची अन् माझी भेट,ओळख खुपच अत्यंत जुनी आहे.मी लहान असतांनाच ती मला अत्यंत आवडली होती.मला चांगले आठवत आहे कि,तेंव्हा मी पाचवीला असेल,तेंव्हा तिची अन् माझी भेट आमच्या गावात झाली होती.पहिल्या भेटीतच ती मला खुपच आवडली होती.जणू काय मी तिच्या प्रेमातच पडलो होतो.तिचा तो लाल काहीसा पिवळ्या रंगाचा ड्रेस आजही मला अगदी कालपरवा पाहिल्यासारखा अगदी स्पष्टपणे माझ्या डोळ्यांच्या समोर चमकत आहे.पण जेंव्हा मी तिला प्रथमदर्शनी तिची भेट घेतली तेंव्हा मी खुपच घाबरून गेलो होतो.मी दोन दिवस तिच्यासोबत होतो.एवढ्या लहाण वयात कदाचित तिच्यावर माझे प्रेम पहिल्यांदाच झाले होते. त्या दोन दिवसांत तिने मात्र माझी खुपच काळजी घेतली. अगदी शेवटच्या दिवशी तर माझ्याजवळचे पैसे पण संपले होते.हे पैसे पण मला तिनेच मोठ्या प्रेमाने दिले. तिने मला एवढे दिले म्हणजेच ति पण माझ्या प्रेमात पडली होती. पण माझी अन् तिची आम्हा दोघांची ती पहिली भेट मी कधीच विसरू शकत नाही किंबहुना ते विसरणे माझ्यासाठी अजिबात शक्य नाही.त्यावेळी मी घरातून रूसून तिच्यासोबत गेलो होतो. माझी अन् तिची पहिली भेट असतांनाही तिने मला कुठेही आमची पहिली भेट आहे असे जाणून दिले नाही.तिने मला घरी सुखरूपपणे पोहच केल्यावर माझ्या आईवडील तसेच भाऊ,वहिनी घरच्या सर्वच मंडळींना खुपच आनंद झाला होता. त्यांना जेवढा आनंद झाला होता अगदी तेवढाच किंबहुना त्यांच्या दुप्पट आनंद मला तिच्या भेटीने झाला होता.पुढे कित्येक वर्ष आमची भेट अशी खास झालीच नाही.जेंव्हा शाळेत जायचो तेंव्हाच तिला कधीकधी लांबूनच पहायचे.अनेकदा तर तिला माहिती पण नसायचे कि,मी तिच्याकडे पहात होतो म्हणून.पुढे असेच आठवड्यातून बाजारच्या दिवशी कधीतरी आमची भेट व्हायची.मी तर अनेकदा तिच्या भेटीसाठी अत्यंत, खुपच भावनिक होऊन शाळा सुटल्यावर तिची नियमितच्या ठिकाणी वाट पहायचो.अनेकदा तर शाळा सुटल्यावर तिला भेटण्यासाठी धावतपळत ठरलेल्या ठिकाणी जाऊन वाट पहात बसायचो.तर तेंव्हा ती तिच्या मैत्रीण सोबत असायची.पण आमचे प्रेम एवढे घट्ट झाले होते की, ति मला दुरून का होईना हात करायची.पुढे असेच लांबून लांबून भेटण्यातच दिवस,महिने, वर्षे कशी निघून गेले ते मला कळलेच नाही.
  पुढे पुढे आम्ही नववीत असतांना क्रिडा स्पर्धेच्या निमित्ताने का होईना तिच्या सोबत मनमोकळेपणाने भेटता आले.त्यावेळी मी तिच्यासोबत खुपच गप्पागोष्टी करायचो. खेळाच्या निमित्ताने का होईना मात्र तिच्या सोबत फिरण्याच्या आनंदाला पारावर कशाचाच नव्हता.नववी आणि दहावीच्या वर्षी वेगवेगळ्या निमित्ताने आम्ही जवळपास 10-12 वेळा भेटलो असतोंन.जेंव्हा मी तीला लांबूनच पहायचो, तेंव्हा तर मला खुपच आनंद वाटायचा किंबहुना तो कोणाला वाटणार नाही. कोणालाही आपल्या प्रियेशीला भेटल्यावर आनंद वाटणारच ना...! तसा मी तीला भेटल्यावर आनंद वाटायचा... 

  पुढे मी इयत्ता 11 वीला कला शाखेत प्रवेश घेतला.आणि तिच्या भेटीचा योग जुळून आला. कारण कि,तालुक्याच्या (गेवराई, जि.बीड) गावाला शाळेच्या विविध कागदपत्रांच्या निमित्ताने आमची भेट व्हायची.आता दिवसेंदिवस आमच्या प्रेमाची गोडी वाढत चालली होती.पुढे बारावीच्या नंतर कामाच्या निमित्ताने मी आणि माझा मित्र महादेव गर्जे आम्ही दोघेही मुंबईला गेलोत त्यावेळी तर तीची आणि माझी भेट नियमितपणे व्हायची.मुंबई येथे गेल्यावर आम्हाला एका ट्रान्सपोर्ट कंपनीत डिलिव्हरी बाँय म्हणून काम मिळाले.आतातर कामावर जाण्याच्या निमित्ताने रोज रोज माझी अन् तीची भेट व्हायची.माझे काम हे फिरतीचे असल्यामुळे वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने आम्ही दोघे भेटले आहोत. अनेकदा रात्रीच्या वेळी तर फक्त ती अन् मीच असायचो, तेंव्हा ती मला तिच्या व्यथा सांगण्याचा प्रयत्न करायची.ती काही जास्त न बोलताही तीच्या भावना मला समजायला वेळ लागत नसे,कारण कि आमचे आता एक वेगळे ऋणानुबंध तयार झाले होते. तसेच ते प्रेमाचे ऋणानुबंध दिवसेंदिवस वाढतच चालले होते. पनवेल येथील त्या पाच वर्षात तिने मला खुपच प्रेमाने, सुखरूप तिच्याबरोबर फिरवले. 
  या पाच वर्षाच्या काळात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवली तसेच अगदी गोव्या पर्यंत आम्ही फिरलोत. तो काळ खुपच सुख समाधानकारक होता. तिने मला महाराष्ट्रातील एकही जिल्हा फिरायचा सोडला नाही. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे,नाशिक, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, ठाणे,पालघर अगदीच काय तर गोंदिया तसेच गडचिरोली येथे तिच मला घेऊन गेली. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील गावे तिने मला दाखवली आहेत.एवढेच काय आपल्या देशातील 10 राज्यांची संलग्नता म्हणजेच फिरण्यासाठी तिची खुपच मोठी गरज भासलेली आहे. त्या 10 राज्यांच्या सीमा ओलांडून जाण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. मंडळी यावरून आपल्याला समजलेच असेल कि,आमच्या दोघांचे एकमेकांप्रती किती प्रेम आहे. तिच्या सोबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे फिरतांना अनेकदा तिला संकटाचा सामना पण करावा लागला. आजपर्यंत तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संकटे आले आहेत, पण ति कोणत्याही प्रकारच्या संकटांना भिक घालत नाही किंबहुना ती पुन्हा नव्याने,नव्या जोमाने, हर्षेउल्हासाने सेवेसाठी सुरू होते. मधल्या काळात जेंव्हा माझे लग्न झाले, तेंव्हा तीने मला खुपच मोलाची खंबीरपणे साथ दिली. एक काळ असा होता कि,लग्नानंतर पण आम्ही सदैव एकमेकांचा हातात घेऊन सोबत राहिलोत.माझ्या लग्नानंतर पण तिने माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी होऊन दिले नाही.काळण कि,मला तिची खुपच सवय झाली होती. कधीकधी मलाच तिचा मनातल्या मनात राग यायचा कारण ती मला आमच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे भेटायला येत नव्हती.पण जेंव्हा ति भेटायची तेंव्हा मला तिच्या अडीअडचणी समजायच्या तेंव्हा मलाच वाटायचे कि,आपण विनाकारणच हिच्यावर रागवलोय.आमच्या संदर्भात असे प्रसंग अनेकदा निर्माण व्हायचे पण तो रुसवा काही क्षणार्धातच दुर व्हायचा.
 पुढे 2014 ला मी तिच्यासोबत कायमचाच आलो. (मला वाहक म्हणून नोकरी मिळाली) आतातर आमच्या आनंदाला पायावर उरला नव्हता. मला सदैव तिच्यासोबत फिरायला, बागडायला मिळणार होते म्हणून खुपच आनंद झाला होता.आता आम्ही सदैव एकमेकांच्या सोबत राहणार होतोत. आमच्या एवढ्या वर्षाच्या प्रेमाचा विजय झाला होता.आता आम्ही सदैव सोबत असतोत. एकमेकांच्या भावना समजून घेत घेत आम्ही प्रतिदिन वेगवेगळ्या ठिकाणी जात आहोत. हल्ली तर माझ्या पत्नीपेक्षा हिच्यासोबतच माझा जास्त प्रमाणात वेळ जात आहे. कारण आमचे प्रेमाचे खुपच ऋणानुबंध जुळले आहेत तसेच यापुढेही कायमस्वरूपी जोडलेले राहतील.आतातर ति माझा श्वास आणि मि तिचा प्राण आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमची साथ अशीच असणार आहे. या आमच्या प्रेमाला गुलाबी, सोनेरी रंग देण्यासाठी आमच्या आगाराच्या आदर्श आगारप्रमुख मा.रेश्मा गाडेकर मँडम,शर्वरी लांजेकर मँडम, टेंगले साहेब, हाटे साहेब, पवार साहेब तसेच सर्व कर्मचारी वर्ग विविध मित्र मैत्रिणी मंडळींचा समावेश आहे. त्यांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नाही किंबहुना त्यांची साथ सदैव आमच्या जिवनात महत्त्वाची आहे.

आमच्यमध्ये एवढे प्रेम आहे की, योगायोगाने म्हणा किंवा आमच्या एकमेकांच्या प्रेमाच्या ऋणानुबंधाने आज लालपरिचा आणि माझा मुलगा चि.संघर्ष या दोघांचाही वाढदिवस आहे. या माझ्या दोन्हीही प्राणप्रिय जिवलगांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमच्या सर्व प्रवासी दैवतांस, हितचिंतकांस,कर्मचारी वर्गास तसेच आमच्यावर प्रेम करणार्या विविध घटकांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन...

 लेखक परिचय
 श्री.मिठ्ठू (राहुल) त्रिंबक आंधळे
9850069474, 9975411807
(लेखक हे रायगड विभागातील श्रीवर्धन येथे वाहक आहेत तसेच सामाजिक, शैक्षणिक,शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात सक्रिय सहभागी असतात तसेच महाराष्ट्र एस.टी.संघर्ष समुहाचे सदस्य आहेत...)

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा