ड्रायव्हर कुठे आहे माहीत नाही, तक्रार वही ठेवत नाही म्हसळा वाहतूक नियंत्रकाचे प्रवाशांना उत्तर
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेली गावे म्हसळा ते सांगवड 15 किलोमीटर
म्हसळा ते घुम 9 किलोमीटर व रुद्रवट गाव 10 किलोमीटर अंतरावर आहेत. या गावांना वाहतूक व्यवस्था सोयीची व्हावी म्हणून एसटी बसची एकमेव सुविधा आहे. परंतु एसटीच्या या सेवेचा बोजवारा उडत असून सांगवड, ठाकरोली, कोकबल, घुम, रुद्रवट, नेवरूळ या गावातील प्रवाशी वर्गाला नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. म्हसळा ते सांगवड या मार्गावरील गाडी नेहमीच नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटत असते तर कधी कधी गाडीचा ब्रेक फेल होतो, कधी टायर पंक्चर होतो, कधी गाडीचा पाटा तुटतो तर कधी गाडीला ड्रायव्हर नसतो तर कधी कंडक्टर हजर नसतो अशी कारणे म्हसळा बसस्थानक मधील कार्यरत असलेल्या वाहतूक नियंत्रक यांच्याकडून ऐकायला मिळतात.
दि.30 मे रोजी दुपारी 01:15 वाजता सुटणारी एमएच 20, डी.9458 या क्रमांकाची नियमित गाडी दु.02:30 वा.सुटल्याने प्रवाशी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गाडी उशिरा सुटण्याचे कारण विचारले असता ड्रायव्हर येईल तेव्हा गाडी सोडू, ड्रायव्हर कुठे आहे माहीत नाही अशी उत्तरे वाहतूक नियंत्रक रमेश गोरेगावकर यांनी प्रवाशांना दिली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आम्हाला तक्रार करायची आहे तर तक्रार वही द्या अशी मागणी प्रवाशांनी केली असता आम्ही तक्रार वही ठेवत नाही असेही उलट उत्तर वा.नियंत्रक गोरेगावकर यांनी दिले. या प्रकारामुळे प्रवाशी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून एसटी वाहतूक व्यवस्थेच्या कारभारात सुधारणा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
"म्हसळा ते सांगवड मार्गावरील दु.01:15 वाजता सुटणारी गाडी नेहमीच उशिरा सुटत असते तर कधी वाहतूक नियंत्रकांचे योग्य नियोजन नसल्यामुळे गाडीची फेरी अचानक रद्द केली जाते तसेच वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली जाते या सर्व प्रकारामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागतो. यामधे सुधारणा झाली पाहिजे."
सांगवड गाडीतील प्रवाशी
إرسال تعليق