श्रीवर्धनचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावतेय ; नयनरम्य समुद्रकिना-याची परदेशी पर्यटकांनाही भुरळ


श्रीवर्धन प्रतिनिधी
जिल्ह्यातील श्रीवर्धन हे पर्यटकांचे माहेरघर समजले जाते . मुंबई - गोवा महामार्गापासन फक्त ४८ किमीवर असणा-या श्रीवर्धनमध्ये पर्यटकांना नागमोडी वळणे घेत यावे लागते . निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या श्रीवर्धनचा प्रवासही तितकाच हवाहवासा वाटतो. येथील नारळी पोफळीच्या बागा , कौलारु घरे , स्वच्छ आणि नयनरम्य समुद्रकिनारा , जीवना बंदर येथील जिवंत मासळी लिलाव , समुद्राच्या लाटांवर डौलणाऱ्या नौका हे सर्वकाही पर्यटकांना खुणावतेय . मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांची श्रीवर्धन ही जन्मभूमी असल्याने श्रीवर्धनला ऐतिहासिक वारसाही आहे . श्रीमंत पेशवे मंदिराची इमारत ज्या जागेवर उभी आहे , त्याचा मुळ दगडी चौथरा हा पेशवेकालीन आहे . या इमारतीसमोर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा असून त्या ठिकाणी असलेल्या पेशव्यांचा कौलारू वाडा हादेखील पाहण्याजोगा आहे . येथील जीवना बंदरातून रोठा सुपारी आणि मासळीचा लिलाव हा देखील प्रसिद्ध आहे . याठिकाणी तालुक्यातील मच्छिमाराच्या होड्या नांगरून ठेवल्या जातात . तेथुनच त्या मासेमारीसाठी खोल समुद्रामध्ये जातात व मासेमारी करुन येथेच परतात . याठिकाणी त्याचा मोठा लिलाव भरतो . हा त्यांचा मोठा लिलाव भरतो . हा लिलाव पाहण्यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात . श्रीवर्धनचा समुद्र किनारा सुमारे ३ कि . मी . लांबीचा स्वच्छ व सुरक्षित आहे . येथील सुरूची झाडे व केतकीची बने या किना - याच्या सौंदर्यात भर घालतात . २०१४ साली येथे सुमारे १४ कोटी रुपये खर्चाचा सुमारे १२०० मीटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला . त्यावर ठिकठिकाणी फुलझाडे लावून व विजेचे खांब , बसण्यासाठीची व्यवस्था , डस्टबीन इत्यादी सुविधा करून त्याचे सुशोभिकरण करण्यात आल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते . श्रीवर्धनच्या नगरीमध्ये प्रवेश करतांना येणा - या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी श्रीवर्धन एसटी आगारासमोर सुसज्ज प्रवेशद्वार आहे . त्याच्या समोर येताच श्रीमंत बाळाजी पेशव्यांच्या जन्मभूमीत आलो आहोत , असे पर्यटकांना वाटते . त्याशेजारी भुवनाळे तलाव असून येथे सकाळ - संध्याकाळ पर्यटकांसह स्थानिकांचीही गर्दी दिसते . मुरूड येथुन बोर्ली शेखाडी मार्ग येणा - या गायगोठण रस्त्यावर स्वयंभू श्री जीवनेश्वर मंदिर आहे . शहरामध्ये हजरत बाबा शमशीदर्गा असून हा दर्गा श्रीवर्धन शहराच्या उत्तरेस डोंगरावर सुमारे ८०० मी . उंचीवर साधारण १६७२ साली बांधलेला आहे . शहराच्या दक्षिणेला १५ कि . मी . अंतरावर हरिहरेश्वर दक्षिणकाशी तिर्थक्षेत्र आहे . त्यामुळे ऐतिहासिक वारसाबरोबरच येथे धार्मिक स्थळेही असल्याने पसंती देतात . तसेच नगरपालिकेने शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले असल्याने , पर्यटक सुरक्षित वातावरणात येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात . एकंदरीत शहरामध्ये आलेला पर्यटक हा पुन्हा पुन्हा श्रीवर्धन शहरामध्ये आवर्जून येत असतो . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा