म्हसळ्यात नविन कार्यकर्ते चांदयावर आणि जुने बांधावर...!
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढायला सुरुवात झाली असून युती-आघाडीचे उमेदवार एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. युतीचे उमेदवार आपण भ्रष्टाचार विरुद्ध लढत आहोत असे सांगत आहेत तर दुसरीकडे आघाडीचे उमेदवार आपण निष्क्रिय खासदार विरुद्ध लढत आहोत असे सांगत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप व आरपीआय (कवाडे गट) आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात होणार आहे. जिल्ह्यातील या दोन दिग्गज नेत्यांना मानणारे वेगवेगळे गट प्रत्येक तालुक्यात आहेत. काही तालुक्यात पक्ष एकच असला तरी कार्यकर्त्यांमध्ये दोन-तीन गट पडलेले आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रुसवे-फुगवे किंवा नाराजीनामा या गुणधर्मात म्हसळा तालुका देखील मागे नाही याचे प्रत्यय अनेक वेळा आलेले असून आताही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस, शेकाप अशा सर्वच प्रमुख राजकीय पक्षातील जुने जाणते जेष्ठ, महिला आघाडी, तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये नाराजीचा असंतोष खदखदत असल्याची वस्तुस्थिती असून याची दबक्या आवाजात गल्लीबोळात, नाक्यानाक्यांवर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर निवडणूक होईपर्यंत अनेक कार्यकर्ते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून आतापर्यंत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात तर काहींनी भाजपात तर काहीजण शिवसेनेत प्रवेश करून आपल्या आपल्या सोयीनुसार व गरजेपोटी आणि स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी पक्षांतर केलेले आहे. तर अनेक जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करून ही शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही याचीही जाणीव अनेकांना करून दिली आहे. या पक्षांतरच्या लाटेत आणि नाराजीनामा नाट्यात अनेकांचा फायदा झाला आहे तर अनेकांना वरिष्ठांच्या मतलबी मर्जीनुसार घरचा रस्ता दाखविण्यात आलेला आहे. या राजकीय वातावरण अनेकांच्या राजकीय भविष्याचा बळी सुद्धा घेतला गेला आहे मात्र याचे वरिष्ठ नेत्यांना काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. काल परवा एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेल्यांना पक्षश्रेष्ठींनी जिल्हा पातळीवर मोठमोठ्या पदांवर नेऊन बसविले आहे तर काहींना तालुक्याचा कारभार सांभाळण्यासाठी तालुक्याचे कारभारी बनवून पक्ष वाढीच्या कामाला जुंपले आहे. एकीकडे काल परवा पक्षात प्रवेश केलेल्यांना महत्वाची पदांची खैरात दिलेली असताना ज्या कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य पक्षाच्या कामासाठी खर्च केलेले आहे किंबहुना पक्ष निष्ठा दाखवून "एक पक्ष, एक नेता" अशी खूणगाठ मनाशी बांधून ज्यांनी उदात्त भावनेतून काम करून पक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले आहे त्यांना आता स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्ष श्रेष्ठींच्या मर्जीनुसार कोणत्याही पदावर घेतलेले नाही किंबहुना जुन्या कार्यकर्त्यांना नवीन पक्षप्रवेश केलेले पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करीत असल्याचे वास्तव म्हसळ्यात पहायला मिळत आहे तर या सर्व राजकीय असंतोषावरून "म्हसळ्यात नविन कार्यकर्ते चांदयावर आणि जुने बांधावर" अशी एकच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या इंनकमिंग व आऊटगोइंग नाटकात आणि पक्षांतराच्या वादळात नवीन जुने वाद चव्हाट्यावर येत असतानाच तालुक्यातील राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत असलेल्या व अनेक वर्षे कार्यरत असलेल्या असंख्य युवक कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षश्रेष्टी व त्यांचे खास मर्जीतील स्थानिक पुढारी दुटप्पी धोरण अवलंबित असल्याने युवावर्गाने नाराजीचा सूर आळविला असून युवावर्गात स्थानिक परस्पर विरोधी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबाबत असंतोषाची लाट उफळली आहे आणि अनेक युवक पर्यायी राजकीय मार्ग म्हणून भाजप किंवा इतर पक्षांच्या शोधात असून दुसरीकडे घरोबा करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर पक्षाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत युवकांना सहभागी करून घेतले जात नाही याउलट वरिष्ठ नेते आले की रॅली काढण्यासाठी व सभेला गर्दी जमविण्यासाठी फक्त तरुणाईचा वापर केला जातो अशी परिस्थिती आहे. सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असूनही कोणत्याही पक्षाने प्रचारासाठी युवावर्गाला फारसे जवळ केलेले दिसत नाही. त्यातच महत्त्वाचे म्हणजे बरेच वर्षे पक्षासाठी काम केलेल्या अनेक जुन्या जाणत्या सर्व पक्षीय आजी माजी पदाधिकारी व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध पदांवर काम केलेले माजी लोकप्रतिनिधी यांनी घरीच राहणे पसंत केले असून साहेबांना दुरुनी माझा साष्टांग नमस्कार अशी भूमिका स्वीकारली आहे. या सर्व नाराजीनामा नाट्याचा फटका युती व आघाडीच्या अशा दोन्हीही उमेदवारांना बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

إرسال تعليق