पाभरे धरणातून पाणी पुरवठा होणारी गावे टंचाईग्रस्त : ६ हजार मतदार मतदानावर घालणार बहीष्कार



पाभरे धरणातून पाणी पुरवठा होणारी गावे टंचाईग्रस्त 
शासन करीत आहे कृत्रिम पाणी टंचाई.


संजय खांबेटे म्हसळा

तालुक्यातील पाभरे धरणातुन तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून  8 गावे आणि 4 वाड्याना पाणीपुरवठा करण्यात येतो.शासनाचे  लघु पाटबंधारे विभागाचे मार्फत  टंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाचे दुरूस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या तोंडसुरे , कांदळवाडा व निगडी नळ पाणी पुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत. तोंडसुरे,सकलप खारगाव खुर्द,रेवली,बनोटी,गणेशनगर,वरवठणे,आगरवाडा,पेडांंबे हि आठ गावे आणि जंगमवाडी,तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणे कोंड,आगरवाडा येथील बौद्धवाडी या 4 वाड्यांं  व धरण भागातील कांदळवाडा, निगडी  अशी १०. गावे व  ६ वाडयाना पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष आले आहे. म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणामधुन विहिरी मार्फत तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते.सदर गाव -वाड्याना शासनाने कृत्रिम पाणीटंचाईच्या झळीत टाकल्याच्या भावना उपस्थितानी व्यक्त केल्या. ग्रामस्थानी संबधीत गाव- वाड्याना तात्काळ पूर्ववत पाणी पुरवठा सुरु करावा अन्यथा टँकरने पाणी पुरवावे अशी मागणी आहे.
      आज तहसीलदार म्हसळा यांची ग्रामस्थानी किमान तिसऱ्यांदा भेट घेऊनही योग्य निर्णय झाला नसल्याने आम्ही २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचे निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. शिष्टमंडळात तोंडसुरे न.पा.पु. चे अध्यक्ष महादेव पाटील , निगडी सरपंच महादेव भिकू पाटील, उपसरपंच गणू बारे, कांदळवाडा मा.सरपंच पांडुरंग बने, खारगाव ( बु ) चे सरपंच अनंत नाक्ती , मनोज नाक्ती, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष यशवंत शिंदे, राजेंद्र पदरथ, संजय लोणशीकर, संतोष पाटेकर, मंगेश मोरे, रमेश काप, आदी पदाधिकारी यावेळी होते.

निवडणूक कालावधीत टंचाई परीस्थीतीला आचार संहीतेचे बंधन येऊ नये म्हणून उप- विभागीय आधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग. वि. अ. व तहसीलदार अशी संयुक्त पहाणी समिती शासनाने गठीत केली आहे. शासन वेळ काढू पणा का करीत आहे?
-महादेव पाटील, अध्यक्ष तोंडसुरे प्रा.न.पा. पुरवठा समिती.

शासन मतदानाचा १ -१ % वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना तोंडसुरे प्रादेशिक व कांदळवाडा - निगडीची सुमारे ६ हजार मतदार पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत ह्याबाबत  शासन  गांभीर्य घेत नाही.
-मनोज नाक्ती , तोंडसुरे

२ .२८७० द.ल.घ.मी. पाणी साठा असणारे व  १६०  हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या धरणातील पाणी चोरून फळबागायतीना नेले जाते, जनतेला पिण्याचे पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकाला लागतो हे दुर्देव आहे.
-महादेव पाटील, सरपंच निगडी.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा