प्रतिनिधी दिघी
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी खेळता खेळता वाट हरवलेल्या मुलाची त्याच्या आईशी भेट घडवून दिली आणि या मातेने सुटकेचा निःश्वास टाकला. बुधवारी ( ता . १० ) ही घटना घडली .
कार्ले अदिवासी वाडीवरील राहणा-या सुगंधा सूर्यकांत हीलम या दिवेआगर नजीक आंबा बागायतीत नोकरी करत आहेत. त्या बुधवारी खरेदीसाठी सकाळी १० वाजण्याच्यादरम्यान बोर्लीपंचतन येथे गेल्या असताना घरी परतल्यावर आपला अडीच वर्षांचा मुलगा सौगंध सूर्यकांत हीलम नसल्याने घाबरुन गेल्या. रोजगार मिळवण्यासाठी भटकंती करणा-या आदिवासी कुटुंबातील मुलगा अचानक हरवला. सकाळपासून शोध घेत असताना मुलगा काही सापडत नव्हता. अखेर अपयशी झालेल्या त्या आईने पोलिस ठाणे गाठले. दिघी सागरी पोलिसांकडे याची तक्रार येताच सहा. पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार संतोष जाधव तसेच गस्तीवरील कर्मचारी पोलीस नाईक विनायक पाटील, के. एन. बठारे, पोलीस शिपाई ए. ए. सावंत यांना तत्काळ सूचना मिळताच श्रीवर्धन - शेखाडी रस्त्याला शोध सुरू केला. मुलाला शोधायचे कसे ? असा पोलिसांसमोर प्रश्न होता. भरडखोल गावापुढे शोध घेत असताना शेखाडी येथे चौकशी दरम्यान दाम्पत्याकडून माहिती मिळाली व मुलाचा शोध लागला. विचारणा केली असता रडून गोंधळलेल्या मुलाला पत्ता काही सांगता येईना. त्याला भरडखोल येथे आणण्यात आले. पोलिसांनी आईची व मुलाची ओळख पटवून मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याच्या आईने पोलिसांचे आभार मानले . खेळता खेळता मुलगा वाट हरवला होता . काही तासांतच मुलाची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणली . खाकी वर्दीतील दिघी सागरी पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

إرسال تعليق