म्हसळ्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील मंजूर रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळेना....!



घुम-रुद्रवट, जांभूळ रस्त्यांची दयनीय अवस्था

●  डांबरी रस्त्यांची कामे रखडली

● तीन महिन्यांपूर्वीच झाले आहे भूमिपूजन

● कामाला सुरुवात नाही, नागरिकांमध्ये संभ्रम

● भाजप - राष्ट्रवादीत मात्र श्रेय वादाची लढाई.

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

      म्हसळा तालुक्यात अनेक गावांतुन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरी रस्ते मंजूर करण्यात आले आहेत या मधील काही गावातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र ही कामे अतिशय संथ गतीने सुरु असून अपूर्ण अवस्थेत आहेत तर काही गावात दोन-तीन महिन्यांपूर्वी भूमिपूजन करून कामाचे मोठमोठे बोर्ड लावण्यात आलेले आहेत मात्र अद्यापही कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यासाठी मुहूर्त मिळेना अशी काहीशी अवस्था पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या रस्त्यांच्या मंजूर कामांचे श्रेय घेण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी या पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधे चढाओढ निर्माण झाली असून दोन्हीही पक्षाचे नेतेमंडळी श्रेय वादाची लढाई लढत आहेत मात्र दोन तीन महिन्यांपासून रखडलेल्या कामाबाबत कोणीच काही बोलायला तयार नाहीत त्यामुळे या भागातील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. तसेच या रस्त्याचे काम होईल की नाही असा प्रश्न नागरिकानां पडला आहे.
    दरम्यान तालुक्यातील श्रीवर्धन जांभूळ फाटा ते जांभूळ गाव पर्यत मंजूर रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे तसेच मौजे घुम फाटा ते रुद्रवट गाव हा रस्ता (ओडिआर 128 ते पाणवे) या नावाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यात आलेला आहे या रस्त्याच्या मंजूर कामासंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच सविस्तर माहिती असलेले बोर्ड घुम फाटा येथे लावून जाहिरातबाजी करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही या डांबरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात काहीही सुरुवात केलेली नाही त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले असून या रस्त्याचे काम होणार आहे असे फक्त आश्वासन नेतेमंडळी कडून दिले गेले की काय अशी शंका उपस्थित होत असून हे फक्त येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूरते गाजर दाखविले की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या भागातील भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करून निवडणुका जवळ आल्या की छोट्या मोठ्या कामांची आमिषे दाखवून वेळ मारून न्यायची सवय स्थानिक नेत्यांना लागली आहे. याचाच प्रत्यय या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना येणार असल्याचे काही सुजाण नागरिक बोलत आहेत. 
घुम-रुद्रवट या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे आणि रस्त्याची धूळधाण उडाली आहे. या बिकट परिस्थितीत रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक, वयोवृद्ध लोकांना मात्र नेहमीच रडत व हेलफाटे खात, कंबरडे मोडत प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वळणावर रस्ता उखडला असून साईडपट्टी नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने कोणताही अपघात न होण्याची वाट बघून या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करून घ्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
तसेच या कामसंदर्भात संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी किंवा प्रतिनिधी माहिती द्यायला तयार नाहीत त्यामुळे हा रस्ता नेमका कधी होईल किंवा होणारच नाही हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. 



◆ भाजप - राष्ट्रवादीत श्रेय वादाची लढाई.
रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पुढारी व कार्यकर्ते या रस्त्यांच्या मंजूर कामावरून श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. भाजप वाले म्हणतात राज्यात आम्ही सत्तेत आहोत मुख्यमंत्री व पालकमंत्री आमचे आहेत त्यामुळे हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आम्हीच मंजूर करून आणला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी वाले सांगतात की जिल्हा परिषद मधे आमची सत्ता आहे. जिप अध्यक्षा आमच्या आहेत स्थानिक जिप सदस्य आमचे आहेत त्यामुळे हा रस्ता राष्ट्रवादीनेच मंजूर करून आणला आहे. या श्रेयवादाच्या लढाईत नागरिक मात्र संभ्रमात आहेत. तर दोघांनीही श्रेय घ्या पण रस्ता एकदाचा लवकर करा अशी विनवणी नागरिक वर्गातून होत आहे.

● घुम-रुद्रवट या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेले असून या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार नेमलेला आहे परंतु सदर ठेकेदाराने काम सुरु करायला उशीर केला आहे त्यामुळे हे काम रखडलेले आहे. आमच्या कार्यालयाकडून संबंधित ठेकेदाराला वारंवार पत्र देऊन काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर ठेकेदार आमच्या सुचनेकडे दुर्लक्ष करीत आहे."
-श्री.चंदन मोरे, ज्युनिअर इंजिनिअर अलिबाग
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

● संबंधित घुम-रुद्रवट रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी जी एजेंसी नेमली आहे त्यांना अनेक वेळा तोंडी तसेच तीन वेळा लेखी पत्र देऊन काम सुरू करायला सांगितले आहे मात्र अद्यापही काम सुरु न केल्याने वरिष्ठ कार्यालय ठाणे येथील अधिकाऱ्यांना कळविले आहे.
- श्री.आनंद गोरे, अभियंता माणगाव, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा