शिक्षकदिन विशेष लेख
कै.जोग सर, रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या निर्मितीचे शिल्पकार
शुक्रवार दिनांक ५/९/२०२५ शिरीष समेळ सर
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिना मुळे शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.
कै.जोगसर (अनंत रामचंद्र जोग) रायगड जिल्ह्यात सर्वांना सुपरिचित असणारे शिक्षण क्षेत्रातील एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व सरांचा जन्म रायगड जिल्ह्यातील हाशिवरे याठिकाणी अतिशय गरीब कुटुंबात झाला.माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर सरांनी कोकण एज्युकेशन सोसायटी मध्ये टाईपिंग इन्सक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात सरांनी कारकुन म्हणून काम केले.१९६२ मध्ये अलिबाग येथे जे.एस.एम.महाविद्यालय सुरू झाले आणि या महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून सरांनी महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला आणि मुंबई विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केली.त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेतील नोकरी सोडून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी पुणे विद्यापिठात प्रवेश घेतला आणि उत्तम गुण संपादन करून पुणे विद्यापीठाची एम.ए.अर्थशास्र ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करून ज्या महाविद्यालयातुन त्यांनी पदवी प्राप्त केली होती त्याच जे.एस.एम.काॅलेजमध्ये प्रथम तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर पुर्णवेळ प्राध्यापक, अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख,जे.एस.एम.महाविद्यालयाचे उपप्राचार्य असा त्यांचा प्रवास सुरू झाला.
महाराष्ट्रात टप्याटप्याने अनुदान या तत्वावर महविद्यालये सुरू होऊ लागली तेव्हा या महाविद्यालयाच्या व्यवस्थापक मंडळा समोरील महत्वाचा प्रश्न अनुभव संपन्न प्राचार्य पदाच्या नेमणुकीच्या होता कोकणात तर त्याबाबतीत खुपचं गंभीर समस्या निर्माण झाली होती कारण कोकण मागासलेला प्रदेश असल्याने अनुभव संपन्न प्राध्यापक आणि प्राचार्य कमी पगारात काम करण्यास सहजासहजी तयार होत नसतं त्याकाळात जोग सरांनी कै.दत्ता पाटील यांच्या सोबतीने रोहा याठिकाणी डॉ.चिंतामणराव देशमुख हे महाविद्यालय सुरू केले आणि रोहा तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून देण्यात कोकण एज्युकेशन सोसायटीला मदत केली,त्यानंतर नानासाहेब सावंत यांच्या सहकार्याने माणगाव याठिकाणी जे.बी.सावंत वाणिज्य महाविद्यालय सुरू केले आणि माणगाव, गोरेगाव, निजामपूर परीसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी निर्माण करून दिली, त्यानंतर कै.ए.आर.अंतुले साहेबांच्या सहकार्याने म्हसळा याठिकाणी वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देऊन म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची दारे उघडी करून दिली या सर्व महाविद्यालयात सरांनी अतिशय कमी वेतनावर प्राचार्य म्हणून आपली सेवा दिली.
आज या सर्व महाविद्यालयाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे हजारों विद्यार्थी या महाविद्यालयामधुन उच्च शिक्षण घेऊन रोजगारक्षम झालेले आहेत आज देखील सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षण घेतलेले विद्यार्थी जोग सरांच्या करड्या शिस्ती बाबतीत नेहमीच बोलत असतात आणि "जोग सर्वांमुळे आम्ही घडलो" असे मोठ्या अभिमानाने सांगतात तर सरांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले विद्यार्थी सरांनी अर्थशास्त्र विषय शिकवताना सांगितलेली उदाहरणे अजुनही आठवतात म्हणून सांगतात, वक्तृत्व स्पर्धेच्या भाषणांची तयारी जोग सरांनी कशी करून घेतली? याबाबतीत चर्चा करतात, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना सरांनी सांगितलेल्या क्लुप्त्या आजही कश्या उपयोगी पडतात? याबाबतीत माहिती देतात.
खरंच रोहा, माणगाव, गोरेगाव, म्हसळा, श्रीवर्धन,मुरूड तालुक्यातील गरीब आणि दुर्बल विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी देणारे सर शेवट पर्यंत सांगायचे मी एक हाडाचा शिक्षक आहे.माझ्या जीवनाचा अंत झाल्यानंतर देखील मी विद्यार्थ्यांना शिकवणार स्वतः घ्या मृत्यूच्या पश्चात नेत्रदान आणि देहदान करून जोग सरांनी आपला शब्द खरा केला आणि मेडिकल काॅलेज मधील विद्यार्थ्यांना तीन वर्षे शिक्षण घेण्यासाठी आपले शरीर उपलब्ध करून दिले.
रायगड जिल्ह्यातील उच्च शिक्षणाची गंगा आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या कै.जोग सरांना आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा.
إرسال تعليق