श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन बाजारपेठेतील दादर पुलावर असलेली पिठाची व मसाल्याची वजगरे बंधू यांची गिरण शॉर्टसर्किट झाल्यामुळे पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ज्यावेळी या ठिकाणी आग लागली, त्यावेळी मोठमोठे स्फोटासारखे आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. श्रीवर्धन शहरात अत्यंत जुनी अशी ही मसाल्याची व पिठाची चक्की गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात होती. तळमजल्यावर पिठाची चक्की असून संपूर्ण वजगरे कुटुंब या चक्कीच्या वरच्या मजल्यावरती राहत होते. परंतु श्रीवर्धन नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
या अग्नितांडवांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवाने या चक्कीच्या बाहेरच्या बाजूला असलेले किराणा मालाचे दुकान वाचले आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेचे अग्निशमन पथक जर वेळेवर पोहोचले नसते तर ही आग पसरून संपूर्ण इमारतीने पेट घेतला असता. त्याचबरोबर इमारतीच्या बाजूला असलेली कौलारू घरेदेखील क्षतिग्रस्त झाली असती. दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने या आगीवरती नियंत्रण मिळवले व आग पूर्णपणे विझवली. या अग्नी तांडवांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून अनेक ग्राहकांनी दळण्यासाठी आणलेले मसाले व धान्यदेखील पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. श्रीवर्धन शहरात दिवसेंदिवस झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अनेक मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. परंतु सदर इमारतींना बांधकाम परवाना देताना, त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकेल का, याची पूर्णपणे पडताळणी केल्यानंतरच बांधकाम परवाना देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
إرسال تعليق