डोबिवली - मोटारसायकलवरुन धूम स्टाईलने येऊन पादचाऱ्यांना लक्ष करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून अटक केली आहे. विरु राजपूत (वय 23) आणि सुखविर रावल (वय 28) अशी अटक आरोपींची नावे असून विशेष बाब म्हणजे यातील सुखवीर हा दिव्यांग आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून 105 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकला असा एकूण 7 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.
डोंबिवली पूर्वेतील पी अॅण्ड टी कॉलनी परिसरात राहणारे वसंताकुमारी नायर (वय 48) या त्यांंची 16 वर्षीय मुलगी गौरी हीच्या सोबत पेंढरकर कॉलेज येथील रस्त्यावरुन पायी चालत जात होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 72 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र चोरुन पळ काढला होता. 17 डिसेंबरला ही चोरीची घटना घडली होती.
याप्रकरणी 18 डिसेंबरला मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
दोघे आरोपी गुन्हा करुन मोटार सायकलवरुन माणगाव येथे गेल्याची बाब त्यात दिसून आली. पोलिसांनी माणगाव येथे सापळा रचून दोघांना 19 डिसेंबरला अटक केली. हे दोघे ही मुळचे मध्य प्रदेश येथील असून सध्या ते डोंबिवलीत दत्त नगर परिसरात राहतात.
आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 6 लाख 32 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 90 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण 7 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच डोंबिवली, खांदेश्वर, पनवेल व रोहा आदि ठिकाणी देखील चोरी केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. चार गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे.
إرسال تعليق