निरंकारी सदगुरुंनी महाड नगरीत दिला प्रेमाभक्तीचा दिव्य संदेश

निरंकारी सदगुरुंनी महाड नगरीत दिला प्रेमाभक्तीचा दिव्य संदेश

परमात्म्याला जाणून निष्काम भावाने भक्ती करावी - सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज


खरसई:  प्रसाद पारावे
‘‘परमात्म्याला जाणून त्याच्या प्रेमामध्ये रंगून जाऊन निष्काम भावनेने केली जाणारी भक्ती हीच खरी परम भक्ती होय.” असे प्रेरणादायी उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील म्हाडा मैदानावर बुधवारी 15 मार्च रोजी आयोजित एक दिवसीय निरंकारी समागमामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. 

या संत समागमात संपूर्ण रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्चयेने भाविक भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी भाग घेतला. भक्तीप्रेमाने ओतप्रोत अशा या अलौकिक संत समागमाच्या सोहळ्यामध्ये भाग घेण्याचे भाग्य लाभल्यामुळे भक्तगण व महाड नगरीतील जनसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. 

सद्गुरु माताजी म्हणाल्या, की खरे पाहता भक्ती ही निष्काम भावनेने करायची असते. भक्ती दिखाव्याची बाब नव्हे. तथापि, मनुष्य भीतीपोटी, कोणत्यातरी कामनेपोटी अथवा शारीरिक स्वास्थ्य बिघडल्यानंतरच ईश्वराची आराधना करत असतो. याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणता येत नाही. ईश्वराच्या प्रति निरपेक्ष आणि निस्सीम प्रेम बाळगून केली जाणारी प्रेमाभक्तीच यथार्थ असते. 

सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराला जाणून भक्ती करता येते. पूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या महान जीवनातून आपण जरुर प्रेरणा प्राप्त करु शकतो; परंतु केवळ त्यांचे अंधानुकरण करुन यथार्थ भक्ती करणे शक्य नाही. सर्वप्रथम आपण स्वत: परमात्म्याला जाणून स्वानुभवाने परमात्म्यावरील आपला विश्वास दृढ केल्यानेच शक्य आहे.

शेवटी सद्गुरु माताजींनी हेच मार्गदर्शन केले, की ब्रह्मज्ञानाद्वारे या परमात्म्याला पाहता येते. त्यानंतर हा ईश्वर आम्हाला कणाकणामध्ये, घटाघटामध्ये, पानोपानी अगदी सर्वत्र आणि सदासर्वदा दिसू लागतो. सर्वांभूती ईश्वराचे दर्शन घडत असल्याने मनातील समस्त भेदभाव नाहीसे होतात आणि आपल्या जीवनात मानवी गुण उतरु लागतात. असे केल्याने आपली भ्रक्ती पक्की होते. सत्याशी नाते जोडल्याने आपल्यातील चांगुलपणा हा सदैव टिकून राहतो. परमात्म्याची क्षणोक्षणी जाणीव आम्हाला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करते आणि आपली भक्ती व विश्वास आणखी दृढ होत जातो.

निरंकारी राजपिताजी यांचे संबोधन

संत समागमामध्ये आपले शुभभाव प्रकट करताना निरंकारी राजपिता रमितजी म्हणाले, की हा मनुष्य देह अनमोल असून तो सत्याची प्राप्ती करण्यासाठी मिळाला आहे. सत्याला जाणून आपण आपल्या जीवनाची बाजी जिंकून जाऊ शकतो. ज्या ईश्वराला कुठेतरी दूर आहे असे म्हटले जाते, एखाद्या विशिष्ट स्थानापर्यंत सीमित ठेवले जाते किंवा कल्पनेत मानले जाते अशा ईश्वराला सद्गुरुच्या कृपेने अंगसंग पाहता येते. त्यानंतर कणाकणामध्ये, पाना-पानामध्ये सर्वत्र त्याचे दर्शन होऊ लागते. या ज्ञानाने हाही बोध होतो, की मी सुद्धा याच ईश्वराचा अंश आहे. अशा तऱ्हेने जेव्हा आत्मा आणि परमात्मा यांचे सख्य होते तेव्हा जीवनातून प्रेमाची धार प्रवाहित होऊ लागते. मनातील अहंकार, वैर, ईष्र्या, द्वेषाचे भाव संपून जातात. जीवन प्रेममय बनून जाते. असे प्रेममय जीवन जर प्रत्येकाचे बनले तर ही धरती कितीतरी सुंदर होऊन जाईल. 

या अगोदर संत समागमाच्या कार्यक्रमात वक्ता, गीतकार, गायक कलाकार व कवी सज्जनांनी आपले विचार, गीत, कविता इत्यादिंच्या माध्यमातून ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीविषयी प्रेरणादायक भावना व्यक्त केल्या. समागमात अनेक मान्यवर सज्जनांनीही भाग घेऊन सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले.

महाडमध्ये आयोजित या दिव्य संत समागमात रायगड झोन झोनल इंचार्ज आदरणीय श्री. प्रकाश म्हात्रे यांनी समस्त भाविक-भक्तगणांच्या वतीने सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांचे हार्दिक आभार प्रकट केले. तसेच स्थानिक प्रशासन व अन्य सरकारी विभागांनी केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा