कोकणातील तरुणांना मिळणार ट्रॅव्हल गाइडचे प्रशिक्षण

टीम म्हसळा लाईव्ह
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना तेथील पर्यटनस्थळांची माहिती देणे तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत ट्रॅव्हल गाइड ( पर्यटन ) मार्गदर्शक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे . याअंतर्गत स्थानिक तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे . त्यामुळे इच्छुक तरुणांनी या प्रशिक्षणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . श्रीवर्धन , अलिबाग , मुरुड , मुरबाड , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सात ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे . या प्रशिक्षणासाठी किमान १८ वर्षे वयोमर्यादा असून शैक्षणिक पात्रतेसाठी ज्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे . त्यांनी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर ज्यांचे वय ४० वर्षांच्या वर आहे . त्यांनी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेच्या सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे . विशेष म्हणजे या प्रशिक्षणात स्थानिक पर्यटनाची माहिती , नियम व सुरक्षा याबाबत उपाययोजना, पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, पर्यटकांशी संवाद साधताना पर्यटनस्थळाबाबतची माहिती गोष्टी रूपाने कशी मांडावी , असे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे .
या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून , हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे " टूर गाईड " ( पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे . त्यामुळे कोकणातील स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन कोकण विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा