दिवेआगर गाव सलग आठ दिवस बंद ; वाढत्या रुग्णसंखेने प्रशासनाने उचलले कडक पाऊल




मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळ दिवेआगरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने ती आटोक्यात आणुन वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असुन त्या अनुषंगाने आरोग्य,महसुल व पोलीस प्रशासन यांच्यासह दिवेआगर ग्रामपंचायत व स्थानिक कोविड उपसमिती यांची तातडीची संयुक्त बैठक शुक्रवार दि. ११ जुन रोजी आयोजित करण्यात आली यावेळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण,वैद्यकिय अधिकारी डॉ.सुरज तडवी,मंडळ आधिकारी सुनिल मोरे उपसरपंच सानिका केळसकर, ग्रामसेवक शंकर मयेकर व स्थानीक कोवीड उपसमिती सदस्य यांनी योग्य तो विचार विनिमय करुन गावामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी दिवेआगर गाव आठ दिवस पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.सदरची बंदी ही रविवार दि.१३ जुन सकाळी ६ ते २० जुन रात्री १२ वा.पर्यंत असेल असा आदेश  ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे काढला असुन याबाबत गावामध्ये दवंडीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली आहे. गावाबाहेर जाणारे सर्व रस्ते पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येणार असुन ग्रामस्थांची गैरसोय होउ नये यासाठी आठ दिवसांसाठी जिवनावश्यक वस्तुंची १३ जुन पुर्वीच साठवणुक करुन ठेवावी त्याचबरोबर औषधांची गरज भासल्यास त्याची यादी ग्राम.पं. कार्यालयात स.१० ते १२ वा.पर्यंत आणुन दिल्यास  दु.३ ते ५ या वेळेत सदर औषधे ग्रामस्थांना उपलब्ध करुन देण्यात येतील.आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने दिवेआगर ग्रामपंचायतीकडुन प्रत्येक घरी सॕनिटायझर,डेटाॕल साबण व मास्क अशा किटचे वाटप करण्यात आले आहे.
या आठ दिवसांच्या प्रतिबंधाच्या कालावधित वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांची अँटीजन तपासणी करण्यात येईल.
ग्रामपंचायतीकडुन वेळो वेळी गावामध्ये आॕक्सीजन लेव्हल,रुग्ण तपासणी,बाधीत घरांवर फवारणी, जनजागृती असे कार्यक्रम राबवण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर पोलीस व आरोग्य प्रशासनाच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई करुनही काही नागरिकांचा निष्काळजीपणा व नियम मोडण्याची वृत्ती कमी होताना दिसत नाही. त्याचाच दुष्परिणाम म्हणून मागील काही दिवसांत गावामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे आपले गाव लवकरच कोरोनामुक्त व्हावे यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,बाहेर पडताना मास्कचा वापर करावा व सुरक्षित अंतर ठेउन आपली व आपल्या कूटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच प्रत्येक ग्रामस्थाने सदर आदेशाचे काटेकोर पालन करुन ग्रामपंचात व सर्व प्रशासकीय विभागाला सहकार्य करावे असे आवाहन दिवेआगर ग्रामपंचायतीकडुन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा