आंबेत पूल १० फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी बंद राहणार



प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रो रो सेवा


टीम म्हसळा लाईव्ह 

कोकणात येणारे प्रवासी, चाकरमानी आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत ते म्हाप्रळ दरम्यानचा सावित्री नदीवरील पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. येत्या १० तारखेपासून पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर या पूलाच्या क्षमतेचा आणि सुरक्षिततेचा मुददा ऐरणीवर आला होता. बॅ.ए.आर. अंतुले हे बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात या पूलाचे बांधकाम करण्यात आले होते. ४० हून अधिक वर्षे जुना असलेला हा पूल कमकुवत आणि धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पूलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शासनाने १० कोटी रूपये मंजूर केले होते. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. आता ते अंतिम आणि महत्वाच्या टप्प्यात आहे. हे काम करताना पूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे.

असे असले तरी कुठलीही पर्यायी वाहतूक व्यवस्था केल्याशिवाय पूलावरील वाहतूक बंद करू नये अशी स्थानिकांची मागणी होती. कारण कोकणातील मंडणगड, दापोली, वेळास, बाणकोट, मुरूड, आंजर्ले, दाभोळ यासारख्या भागात जाणार्‍या चाकरमान्यांना वळसा घालून जावे लागणार आहे. शिवाय खाडी किनारी असलेल्या गावांचाही संबंध तुटणार होता. ही बाब लक्षात घेवून या ठिकाणी फेरीबोट म्हणजेच रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दोन्ही बाजूला जेटी उभारण्यात आली. आता या जलमार्गावर येत्या ८ फेब्रुवारीपासून रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपली वाहने घेवून या बोटीतून प्रवास करता येणार आहे.

 

सावित्री नदीवरील या पूलाची लांबी ३७६ मीटर लांब इतकी आहे. या पूलाच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून १० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. पूलावर पॅडलस्टन आणि बेअरींग बदलायचे काम केले जाईल तेंव्हा पूल स्लॅब आणि गर्डरसह लीफट करावा लागणार आहे. त्यासाठी १० फेब्रुवारीपासून हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. - एस. एस. उलागडे, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

आंबेतचा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही तेथेच ८ फेब्रुवारीपासून रो रो सेवा सुरू करत आहोत. यातून प्रवाशांना ट्रक, टेम्पो, रिक्षा, बस, मोटारसायकल अशी वाहने घेवून प्रवास करता येणार आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.- डॉ. चंद्रकांत मोकल, सुवर्णदुर्ग शिपींग ऍन्ड मरीन सर्व्हीसेस

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा