कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर माघी गणेशोत्सव 2021 करिता शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी


टीम म्हसळा लाईव्ह
माघी गणेशोत्सव 2021 मार्गदर्शक सूचना कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 15 फेब्रुवारी, 2021 रोजी सुरु होणारा माघी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यानुषंगाने शासनाकडून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

1. सार्वजनिक माघी गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

2. मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

3. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे मागील वर्षी " गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी किंवा सन 2021 च्या भाद्रपद महिन्यात विसर्जनाच्या वेळी गणपती विसर्जन करणे शक्य आहे " असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अद्यापही कोरोनाच्या प्रादूर्भाव असल्याने माघी गणपती आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

4. माघी गणेशोत्सवामध्ये मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती गणपती मुर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी.

5. या वर्षी शक्यतोवर पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास सार्वजनिक विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

6. माघी सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे (उदा . रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी .

7. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

8. गणपती मंडपांमध्ये निर्जंतूकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

9. मंडपात एकावेळी 10 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच एकावेळी फक्त 15 भाविकांना दर्शनासाठी मंडपामध्ये प्रवेश देण्यात यावा.

10. महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इ. च्या मदतीने नियमांचे काटेकोर पालन करुन तलाव, नदी अथवा समुद्र किनारी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. मूर्ती विसर्जनाच्या वेळी त्या ठिकाणी जास्तीत जास्त 5 कार्यकर्ते असावेत. संबंधित प्रशासनाने कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

11. कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, तसेच संबंधित महापालिका, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व माघी गणेशोत्सव प्रत्यक्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करण्यात यावे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा