बोर्लीपंचतन येथे नागरीकांचा मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठा कंपन्या विरोधात संतप्त मोर्चा


बोर्लीपंचतन येथे नागरीकांचा मोबाईल नेटवर्क विरोधात संतप्त मोर्चा ; इंटरनेट सेवा त्वरीत सुधारण्याची मागणी

मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागामध्ये गेले काही महीने इंटरनेट सेवेसह मोबाइल रेंजची अवस्था खुपच दयनिय झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.या विभागात वोडाफोन आयडीया व शासनाचे BSNL या मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कच्या सुविधा चालु आहेत परंतु त्या असुन नसल्यासारख्याच आहेत या विभागात वोडाफोनची ग्राहकसंख्या जास्त असुनही गेले वर्षभर त्यांच्या इंटरनेट सेवेबाबत बोंब आहे.याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन व दुरध्वनीद्वारे संपर्क साधुनही अधिकाऱ्यांकडून वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्राहकांना योग्य ती सेवा मिळत नसल्याने वोडाफोन मोबाईल नेटवर्क कंपनीच्या विरोधात बोर्लीपंचतन येथील बस स्थानक ते मोबाईल टाॕवर पर्यंत मोर्चा काढुन नागरीकांनी आपला संताप व्यक्त केला.एका बाजूला सेवेची बोंबाबोंब असली तरी दुसरीकडे मात्र रीचार्जपोटी भरमसाठ रक्कमांनी ग्राहकांच्या खिसा कापण्याचा उद्योग या कंपन्यांकडुन राजरोसपणे सुरु आहे.केंद्र शासनाने सर्वसामान्यांसह सर्वांचेच काम झटपट व्हावे,या हेतूने ऑनलाइन सुविधा सुरु केल्या आहेत.परंतु ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेटवर्क व्यवस्थित उपलब्ध होत नसल्याने मोबाइल कंपन्यांकडून घेतलेल्या सेवेचे पैसे वाया जात आहेत.या कंपन्या फोर-जी सेवा देण्याचा दावा करत असले तरी थ्री-जी सेवा सुद्धा उपलब्ध होत नाही.रिचार्जची मुदत संपल्यावर क्षणात सेवा खंडीत करणाऱ्या कंपन्या नेटवर्क खंडित काळातील पैसे परत करतील का ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. इंटरनेटची सेवा योग्य नसल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार तसेच सर्व शासकिय कार्यालयातील आॕनलाइन असणाऱ्या सेवांची कामे इंटरनेट अभावी खोळंबुन राहतात त्यामुळे नागरीकांचा वेळ व पैसा व्यर्थ जात आहेत.अशा विविध समस्यांकडे आंदोलनकर्यांनी लक्ष वेधले या आंदोलनात शामकांत भोकरे,सुकुमार तोंडलेकर,महंमदभाई मेमन,नंदु पाटील,निवास गाणेकर,डाॕ.सुजाता बापट बोर्लीपंचतन सरपंच नम्रता गाणेकर,उपसरपंच उत्तम दिवेकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरीक सहभागी झाले होते. त्याचबरोर सदर मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस आधिकारी श्री.बापुराव पवार,म्हसळा पोलीस ठाण्याचे API श्री.मोरे व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कंपनीचा कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने आपल्या विविध तक्रारींचे निवेदन तहसीलदारांच्या वतीने मंडळ अधिकारी सुनिल मोरे यांनी स्विकारले

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा