विक्रोळीत रंगले महिलांचे पहिले वहिले काव्यसंमेलन


स्त्री शक्तीची भूमिका अधोरेखित करणारे काव्यसंमेलन - मंजिरी मराठे

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मुंबई : आधुनिक - स्त्री विकास प्रतिष्ठान या महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटकणाऱ्या आणि मराठी साहित्य व केला सेवा या नवोदितांच्या साहित्य व कलेसाठी वाहिलेल्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त विक्रोळीत पहिले वहिले महिला काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात दूरदर्शनच्या सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त व कोषाध्यक्ष तसेच संमेलनाध्यक्षा मंजिरी मराठे, आधुनिक - स्त्री विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या सरमळकर, खजिनदार संगीता मर्गज, सल्लागार प्रेमावती सरमळकर, श्री महादेव उपाध्याय शाळेच्या विश्वस्त गिरीजादेवी,  समाजसेविका प्रज्ञा अहिरे यांच्या शुभहस्ते पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय  स्मारकाचे व्यवस्थापक संजय चेंदवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

संमेलनाध्यक्षांचे मनोगत हे काव्यसंमेनाचे मुख्य आकर्षण होते. दूरदर्शनच्या सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त व कोषाध्यक्ष तसेच सावरकरांच्या साहित्याच्या गाढ्या अभ्यासक मंजिरी मराठे यांनी उपस्थित कवयित्रींना मोलाचे मार्गदर्शन करतानाच विविध क्षेत्रातलं स्त्रीयांचं महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केलं. त्यांनी कथन केलेली सावरकरांची जडणघडण आणि त्यांच्या निस्सीम देशभक्तीचे वर्णन एकताना सभागृह दंग झाले होते. समाजभान राखताना भ्रमणध्वनी आणि समाज माध्यमांचा वापर गरजेपुरता करा, त्यांच्या अधीन जाऊ नका. तसेच आपल्या पाल्यांनाही वेळीच आवर घाला असा मोलाचा सल्ला सर्वच उपस्थित कवयित्रींना दिला. 

आधुनिक - स्त्री विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या सरमळकर यांनी संमेलनाचे प्रास्ताविक करताना जागतिक महिला दिनाचे महत्व सांगत जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिलांच्या काव्यसंमेलनाची भूमिका मांडली. यासाठी सहकार्य करणाऱ्या गुरुदत्त वाकदेकर यांचे कौतुक केले. तसेच आधुनिक - स्त्री विकास प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती तसेच स्त्री सक्षमीकरणासाठी चालू असलेल्या कार्याची माहिती विषद केली.

तत्पूर्वी या संमेलनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतल्या वैभवी गावडे, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, सरोज गाजरे, प्रितफुल, अनिता गुजर, अश्विनी बोलके, भारती सावंत, वैदेही मुळ्ये, सुचित्रा कुंचमवार, सुधा गोखले, क्रांती पाटणकर, कुसुम बागले, मृणाल ठाकुरदेसाई, शबाना मुल्ला, गौरी शिरसाट, ज्योती गोळे, दैवशाला पुरी, सुनिशा कुलकर्णी, मनीषा ताम्हणे, पूर्वा चौधरी, प्रणाली म्हात्रे, सानिका येडगे, जयश्री बोरसे, अनिता पेवेकर, वृषाली खाड्ये, स्वरुप सावंत, प्रविणा वाघमारे, मृगनयना भजनगवरे, सविता काळे आदी कवयित्रींनी सहभाग नोंदवला. सर्वांना मंजिरी मराठे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र, पुस्तकं, लेखणी व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

नवोदितांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यांच्या लिखाणाला व कलेला चालना मिळावी हा या संस्थेचा प्रांजळ हेतू आहे असे मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संस्थापक गुरुदत्त वाकदेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली म्हात्रे व गौरी शिरसाट यांनी उत्तमरीत्या केले. भारती सावंत, आशा भालेराव, हर्षल, रवींद्र सातपुते, सुर्यकांत कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष  मेहनत घेतली. विद्या सरमळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा