मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साठये महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय! १९५९ साली स्थापन झालेल्या ह्या महाविद्यालयाने महाराष्ट्राच्या मातीला तसेच भारतभूमीला अनेक प्रतिभावान व दिग्गज व्यक्तिमत्वे दिली आणि तीच परंपरा इतक्या वर्षानंतर आजही अव्याहतपणे सुरूच आहे.
साठये महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ हे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा एक भाग आहे. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने अनेक चतुरस्त्र वक्ते, लेखक, अभिनेते महाराष्ट्राला दिले आहेत. साठये महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने २०१४ साली 'सप्तरंग' हा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामहोत्सव सुरु केला आणि हा स्पर्धामहोत्सव महाराष्ट्रभर गाजत आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आकार देण्याचे 'सप्तरंग' हे एक व्यासपीठ ठरले आहे. राज्याच्या शहरी क्षेत्राबरोबरच ग्रामीण क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या स्पर्धामहोत्सवात स्पर्धक म्हणून सहभागी होत असतात. 'सप्तरंग' या नावाप्रमाणेच या स्पर्धा महोत्सवात विविध प्रकारच्या सात स्पर्धांचा समावेश करण्यात येतो.
या स्पर्धा महोत्सवाचे २०१९-२० हे सहावे वर्ष आहे. दि. ९, १० व ११ जानेवारी ला होणाऱ्या या स्पर्धा महोत्सवात वक्तृत्व, वादविवाद, स्वरचित काव्यवाचन, स्टॅंड-अप-कॉमेडी, खो-खो, निबंध आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 'विनय आपटे प्रतिष्ठान' यांचे मोलाचे योगदान या महोत्सवासाठी लाभले आहे. ७५ हून अधिक नामांकित महाविद्यालयांमधून २००० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
कला, साहित्य, संगीत, क्रीडा आदींची आवड असणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धा महोत्सवात स्पर्धक म्हणून सहभागी व्हावे व त्यासोबतच विविध महाविद्यालयांतील संबंधित प्राध्यापकांनी या स्पर्धामहोत्सवात सहभागी होऊन आम्हाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन साठये महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धामहोत्सवा संबंधित अधिक माहितीसाठी संपर्क: शंकर ७०३९६१२२७२
إرسال تعليق