देश हिताच्या दृष्टीने सामाजिक सलोखा निर्माण करण्यात साहित्यिक, पत्रकारांचा महत्वाचा वाटा असतो - भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक

◆ कवी संमेलन व पत्रकारिता प्रशिक्षण संपन्न 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   दि म्हसळा टाइम्स आणि साहित्य चर्चा मंच आयोजित कवी संमेलन आणि पत्रकारितेचा वसा शिबीर कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन येथे संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री.कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
   यावेळी कृष्णा कोबनाक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की देशात लोकशाही अबाधित ठेवण्यात पत्रकार वर्गाचा महत्वाचा वाटा असतो. पत्रकार हा वर्ग लोकशाहीत महत्वाची भूमिका बजावताना सदैव निदर्शनांस आले आहे. लोकशाही च्या बळकटी चे काम चौथ्या स्तंभाने नेहमी केले आहे. सद्यस्थितीत देशात काही ठराविक घटक त्यांच्या स्वार्थासाठी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या कारणे देश दोन गटात विभागला जातोय. अनेकांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे. अशावेळी पत्रकारांनी निर्भीड पणे सत्य जनतेच्या समोर आणावे व सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातील भीती दूर करावी तसेच साहित्यिक वर्गाने सुद्धा समाजासमाजात होणारे मतभेद, वाढती विषमता या दरी कमी करण्यासाठी मार्मिकपणे विचार मांडून लोकांचे मनपरिवर्तन केले पाहिजे. त्याचबरोबर पत्रकारांनी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता निर्भीडपणे काम करून सर्व घटकांना न्याय दिला पाहिजे. देश विदेशात वेगवेगळ्या दुर्घटना घडत असतील किंवा वैचारिक पातळी घसरत असेल तर देश हिताच्या दृष्टीने सामाजिक सलोखा निर्माण करण्यात साहित्यिक, पत्रकारांचा महत्वाचा वाटा असतो असे महत्वपूर्ण प्रतिपादन रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी केले.
  साहित्यिक डी.ए.जगताप यांनी अमूल्य असे विचार मांडताना सांगितले की समाजात हित राखण्यात पत्रकारांची भूमिका अवर्णनीय असते असे सांगून एखादी घटना घडली तर त्याची बातमी जरूर करावी आणि एवढ्यावरच न थांबता त्या घटनेची सखोल माहिती घेऊन घटनेच्या मुळाशी जाऊन बातमी मागची शोध बातमी लिहिण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला.
  तसेच यावेळी माजी सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुरेंद्र हनुमते, माजी पोलीस रोहिदास दुसार, संस्थापक रमेश पोटले, कोमसाप श्रीवर्धन अध्यक्ष दिलीप हेंद्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर या मान्यवरांनीही साहित्यिक क्षेत्रावर विचार व्यक्त करून मार्गदर्शन केले.
  श्रीमती सीमा रिसबुड, रश्मी जोशी या कवयित्रीनी व इतर कवींनी राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, वाढते प्रदूषण, नष्ट होत असलेल्या वनसंपदा, सावित्री नदी महाड दुर्घटना, पत्रकार व राजकीय पुढारी अशा वेगवेगळ्या विषयांवर कविता सादर केल्या.
  यावेळी आयोजित कार्यक्रमाला रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, साहित्यिक डी.ए.जगताप, माजी सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुरेंद्र हनुमते, माजी पोलीस रोहिदास दुसार, संस्थापक रमेश पोटले, कोमसाप श्रीवर्धन अध्यक्ष दिलीप हेंद्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर, मुंबईतुन आलेले प्रमुख पाहुणे सायली चरफरे, के.एम.व्यास, समाजसेवक बबन उंडरे, जेष्ठ पत्रकार आनंद जोशी, प्रा.दशरथ कातकर, शाहीर भिमराव सूर्यतल, पत्रकार तथा कवी विनायक जाधव, जयसिंग बेटकर, संतोष सापते, व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा