आ. अनिकेत तटकरे यांनी पालकमंत्र्यांसमोर ठेवल्या अनेक मागण्या...

आ. अनिकेत तटकरे यांनी पालकमंत्र्यांसमोर ठेवल्या अनेक मागण्या; जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजवली- महत्त्वपूर्ण बैठकीस अनेक खातेप्रमुख गैरहजर असल्यावर घेतला आक्षेप
 
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
आज रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरीच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकावल्याबद्दल कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निर्वाचित विधानपरिषद सदस्य आ. अनिकेत तटकरे यांनी अभिनंदनाचा ठराव या बैठकीत मांडला. तसेच बैठकीस उपस्थितांची ओळख करून देण्याची विनंती केली. यावेळी १९ खातेप्रमुख या बैठकीस गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.

नियोजन समितीच्या महत्वपूर्ण बैठकीत सभागृहातील अधिकाऱ्यांची उपस्थिती कमी दिसली असता मा. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांची ओळख करून देण्याची आ. अनिकेत तटकरे यांनी विनंती केली. पालकमंत्री व लोकप्रतिनिधी वेळेपूर्वी बैठकीस येऊन बसले परंतु शासकीय अधिकारी नियोजित वेळेनुसार देखील हजर नव्हते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे आश्वासन दिले. खातेप्रमुखांच्या ओळख परेडवेळी अनेक अधिकारी गैरहजर होते. त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

या बैठकीत आ. तटकरे यांनी जिल्ह्यातील मंडणगड येथील क्रीडा संकुलास मंजूरी झालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीबाबत तसेच हे काम पूर्णत्वास न गेल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्याचप्रमाणे पोयनार ता. खेड येथे लघु पाटबंधारे योजनेंतर्गत धरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून निधीअभावी हे काम सुमारे सहा ते सात वर्षांपासून प्रलंबित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांना ॲानलाईन सातबारा मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता ॲाफलाईन सातबारा ग्राह्य धरावा अशी मागणी त्यांनी केली. सीआरझेड, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, विद्युत वितरण विभागाचे प्रश्न अशा अनेक समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी आ. अनिकते तटकरे यांनी या बैठकीत केली.

रायगड-रत्नागिरीला जोडणारा आंबेत खाडीवरील पूल १० फेब्रुवारीपासून बंद करण्यात येणार आहे. सदर पूल बंद झाल्यास विद्यार्थ्यांसह व्यापारी व पर्यटकांची गैरसोय होणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. परीक्षेला मुकावे लागल्यास शैक्षणिक नुकसान होऊ शकते. याकरिता लवकरात लवकर रो-रो बोट सुरू करून शासनाकडून तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असल्याची मागणीही आ अनिकेत तटकरे यांनी पालकमंत्र्यांसमोर ठेवली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी काहीच उपाययोजना केली नसल्याने सांडपाणी येथील नागरिकांच्या घरात व दुकानांत शिरत आहे. याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणीही त्यांनी केली.सीआरझेड, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, विद्युत वितरण विभागाचे प्रश्न अशा अनेक समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा