'क्यार' चक्रीवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. त्यामुळे दिघी खाडीतून होणारी दिघी - आगरदांडा ही जलवाहतूक उशिरा सुरू आहे. या वादळाचा ऐन दिवाळीत श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून, समुद्रकिनारी शुकशुकाट दिसत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. दिवाळीमध्ये पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे, साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची चांगलीच पसंती राहते.
रायगडमध्ये 'क्योर' चक्रीवादळाचा किनारपट्टीला तडाखा बसला असून या वादळाचा फटका तालुक्यातील पर्यटनाला बसला आहे. शिवाय गुरुवारपासून दिवसा व रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गणेशोत्सवात झालेली अतिवृष्टी व सध्या पडणाऱ्या पावसामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छिमारांनी गुरुवार सायंकाळी वादळापासून सुरक्षिततेसाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या खाडीत आश्रय घेतला आहे. बदलत्या वातावरणामुळे मासेमारी व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यंदाच्या मासेमारीची सुरुवात रडतखडत झाली. आता अचानक वादळी वाऱ्याचे संकट आल्याने अनेक जिल्ह्यातील मच्छीमार नौका दिघी खाडी किनाऱ्यालगत विसावल्या आहेत. पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले असून त्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
श्रीवर्धन तहसील व दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून दिघी बंदर परिसरात मच्छिमारांची भेट घेण्यात आली. क्यार वादळामुळे व समुद्रातील संभाव्य भीतीमुळे इतर राज्ये तसेच जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी दिघीकिनारी विसावल्या आहेत. त्यामुळे श्रीवर्धन तहसीलकडून या बोटींवरील खलाशांसाठी औषधे, टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात आला. यावेळी दिघी बंदर येथे तहसीलदार सचिन गोसावी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरिक्षक एम. आर. शेलार, पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण, मंडळअधिकारी सुनील मोरे, तलाठी सोरे, आरोग्य सेवक कासारे व कोतवाल गणेश महाडिक उपस्थित होते. वादळाची दिशा बदली असल्याची माहिती श्रीवर्धन प्रशासनाकडून देण्यात आली. श्रीवर्धन तालुक्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले.

إرسال تعليق