● आज मुंबईत ठिकठिकाणी पक्षीय मेळावे
● सुनिल तटकरे, आदिती तटकरे, विनोद घोसाळकर, माणिकराव जगताप यांसह दिग्गज मुंबईत होणार दाखल
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले असून 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून आपआपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. आणि आता प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन, मेळावे, प्रचार सभा, कॉर्नर सभा, गाव बैठका घेऊन प्रचारावर भर देण्यात आला आहे.
राज्यातील काही विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या व तुल्यबळ लढती होणार आहेत त्यामधीलच एक मतदारसंघ म्हणजे 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ होय. या मतदारसंघात मागील 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोलबाळा असून अनेक ग्रामपंचायत, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत, नगरपालिका यांमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे प्रस्थान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील 15 वर्षात आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री, ऊर्जा मंत्री, जलसंपदा मंत्री, अन्न व नागरी विकास मंत्री, पालकमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळले अनुभवी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांनी खेडोपाड्यात, गावागावात लाखो रुपयांची विकास कामे केली असल्याने जनमानसात त्यांची एक वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थाचे विधानपरिषद आमदार आहेत. आणि आता आघाडी च्या माध्यमातून खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांची कन्या, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवली आहे.
खासदार सुनिल तटकरे यांचा चौफेर उधळलेला राजकीय अश्वरथ रोखण्यासाठी तसेच आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधात शिवसेना व भाजप युतीने मुंबई येथील माजी आमदार तथा म्हाडाचे सभापती, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांना मुंबई वरून आयात केली आहे. मतदारसंघात ग्रामीण भागातील नागरिकांशी संपर्क नसलेल्या घोसाळकर यांना येथील जनता कितपत स्वीकार करतील हा सुद्धा प्रश्न गुलदस्त्यात आहे.
श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा, या तालुक्यातील अनेक गावांमधील बहुतांश नागरिक हे मुंबईत वास्तव्यास आहेत. मुंबईत उपनगरे, विरार, नालासोपारा, भाईंदर, बोरिवली, ठाणे व इतर परिसरात नोकरी, व्यवसाय निमित्ताने तसेच मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघातील जनतेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. आजमितीला गावागावात घरे कुलूपबंद असून गावे ओस पडली आहेत ही मोठी शोकांतिका असून लाजिरवाणी बाब आहे. आजच्या घडीला 70 ते 80 टक्के मतदार विविध कारणांनी मुंबईत निवासी झाले आहेत. श्रीवर्धन मतदारसंघात उद्योग व्यवसाय नसल्याने येथील नागरिकांना किंवा तरुण वर्गाला रोजगार नाहीत, उच्च शिक्षणाच्या सुविधा नाहीत, सुसज्ज व सुरळीत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत याचे येथील नेत्यांना काहीच सोयरसुतक नाही.
नामनिर्देशन पत्र दाखल करून झाले असल्याने मुंबईत राहणाऱ्या मतदारांशी संपर्क साधण्याचा उद्देशाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी देखील मुंबईत बोरिवली येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन हाती शिवबंधन बांधलेले माजी आमदार अवधूत तटकरे, उमेदवार विनोद घोसाळकर, हे संबोधित करणार आहेत अशी माहिती मुंबई निवासी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आज पार पडणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आय यांच्या युती-आघाडीच्या मुंबई मधील मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
माणिकराव जगताप मुंबई निवासी मतदारांशी साधणार संवाद :-
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात आणखीन एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात ते काँग्रेस आय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा महाड पोलादपूर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार माणिकराव जगताप यांच्या प्रचारनिमित्ताने देखील मुंबईत श्रीकृष्ण सभागृह दादर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनिल तटकरे हे आघाडी धर्म पाळून आणि माणिकराव जगताप यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यातून जिल्ह्याचे खासदार म्हणून महाड पोलादपूर मतदारसंघातील मुंबई निवासी मतदारांशी संवाद साधून मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांचे समवेत, उमेदवार माणिकराव जगताप व काँग्रेसचे मुंबईतील आजी माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

إرسال تعليق