193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात,दोन उमेदवारांची माघार

193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात,दोन उमेदवारांची माघार, 
शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात लढत काँग्रेसकडून तीन बंडखोर.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी

193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण चौदा उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. 16 उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. परंतु खऱ्या अर्थाने लढत होणार आहे ती शिवसेनेचे विनोद घोसाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्यातच. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी झालेली असल्याचे बोलले जात असले तरीही श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तीन पदाधिकारी बंडखोर उमेदवार म्हणून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यामध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर मुवीज शेख व जिल्हा काँग्रेसचे दुसरे उपाध्यक्ष श्रीवर्धन येथील दानिश लांबे यांचा समावेश आहे. हेमंत यशवंत देशमुख (अपक्ष) विनेश विजय घोसाळकर (अपक्ष) या दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले.

लढतीतील उमेदवार पुढीलप्रमाणे पवार ज्ञानदेव मारुती (अपक्ष) संतोष तानाजी पवार (अपक्ष) विनोद रामचंद्र घोसाळकर (शिवसेना) डॉक्टर शेख मूवीज अब्दुल अजिज (अपक्ष) आदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) भास्कर नारायण कारे (अपक्ष) सुमंत यशवंत सकपाळ ( बहुजन समाज पार्टी) महक फैसल पोपेरे (अपक्ष) गीता भद्रसेन वाढई (अपक्ष) अकमल असलम कादरी (इंडियन मुस्लिम लीग) रामभाऊ रामचंद्र मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी) संजय बाळकृष्ण गायकवाड (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) लांबे दानिश नईम (अपक्ष) देवेंद्र धर्मा म्हात्रे (अपक्ष) 
श्रीवर्धन मतदारसंघातील परिस्थिती पाहता या ठिकाणी बहुजन समाज पार्टी किंवा बहुजन मुक्ती पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे मतदार अत्यल्प आहेत. त्याचप्रमाणे अपक्ष उभे असलेले उमेदवार मतदारांवर आपला फारसा प्रभाव पाडून फार काही मते आपल्या पदरात पडू शकणार नाहीत. त्यामुळे आपल्याला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघांमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत दिसणार आहे शिवसेनेचे विनोद घोसाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्या मध्येच. श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला पूर्णपणे पाठिंबा देण्याचे ठरवले असून सर्व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारासाठी कामाला लागलेले पाहायला मिळते. त्याचप्रमाणे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेले अनेक पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांनी पुन्हा शिवसेनेत घरवापसी केल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा