सावधान . . . पुढे रस्ता खचतोय !


 आदगाव - वेळास रस्त्याच्या संरक्षण भिंतीला भगदाड  ; रस्ता बंद होण्याची भीती

गणेश प्रभाळे : दिघी
श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आदगाव मार्गावरील रस्ता खचत असल्याचे दिसते . सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . मात्र , सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीही केले नसल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शनिवारी बोर्लीपंचतन शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते . मंगळवारपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसासोबत समुद्राच्या जोरदार क्षारयुक्त लाटांमुळे वेळास फाटा येथून दोन कि . मी . वर असणाऱ्या रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे . सध्या जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण रस्त्याच्या पडण्याची भीती आहे . रस्त्यालगत समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा आहे . मात्र , तोही पूर्ण मोडकळीस आला आहे . वेळीच दुरुस्ती झाली नाही तर वेळास व आदगाव या दोन्ही गावांचा संपर्क तुटू शकतो . आदगाव जाणाऱ्या मार्गातून प्रवास करते वेळी वाहनचालकाला रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फूट खोल असताना त्याच खड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे . मात्र , संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनार्थ घडू शकतो . यामुळे या रस्त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत . सागरी मार्ग म्हटल्यावर समुद्राची भरती - ओहोटी , लाटांचा मारा या गोष्टी लक्षात घेतल्यास रस्त्याची वारंवार करावी लागणारी देखभाल न झाल्याने वेळास - आदगाव रस्ता पूर्णपणे खचला आहे . मुख्य जिल्हा मार्ग असल्याने रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे . विशेष म्हणजे , अधिकाऱ्यांना या रस्त्याची कल्पना असूनदेखील कोणत्याही प्रकारची तत्काळ दुरुस्ती केली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे . काही दिवसांतच पडणाऱ्या पावसामुळे साइडपट्टी खचल्याठिकाणी रस्ता खचल्याचे दिसून येत आहे . रस्त्याची दुरुस्ती होऊन संरक्षक कठडे डागडुजी होण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत . 

वेळास येथील खचलेल्या रस्त्यावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम खाते माती टाकून भराव करते . मात्र , पावसाळ्यात पुन्हा पुन्हा रस्ता खचतो . बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होतेय . कायमस्वरुपी पक्के रस्ते व्हावे . 
-धवल तवसालकर , वेळास 

वेळास - आदगाव रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे . 
-श्रीकांत गणगणे उपअभियंता , सा . बां . विभाग 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा