मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामाची ऐशी की तैशी...! रस्त्याचे व साकवाचे काम अर्धवट ; गावांचा तालुका संपर्क तुटणार



रस्ते विकास ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ऐन पावसाळ्यात घुम, रुद्रवट गावांचा तालुका संपर्क तुटणार

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. म्हसळा तालुक्यातील देखील काही गावातील जोडरस्त्यांना मुख्यमंत्री सडक योजनेतून मान्यता मिळाली आहे परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीपणा मुले व या योजनेशी संबंधित असलेल्या अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे रस्त्यांच्या कामांना विलंब होत आहे व याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत म्हसळा तालुक्यातील घुम-रुद्रवट या दोन गावांंसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून नवीन रस्त्याचे कामाला एक कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. रस्ता विकास कामाचा ठेका मयुरी कॅट्रक्शन, तुर्भे नवी मुंबई यांचे नावे असुन तो तयार करण्यासाठी अन्य एका पोट ठेकेदाराकडे वर्ग केला आहे. संबंधित ठेकेदारा करवी रस्ता सुधारणा कामात खुपच दिरंगाई झाली आहे. पावसाला उशिरा सुरुवात झाली असतानाही घूम आणि रुद्रवट गावाला जोडणाऱ्या मुख्य साकवाचे बांधकाम धिम्या गतीने चालु असल्याने भर पावसात घुम येथील नदीपात्राचे पाणी वाढले तर दोन्ही गावांचा रहदारीचा मुख्य मार्गच बंद होईल आणि घुम,रुद्रवट गावांचा म्हसळा तालुका आणि शहरातील संपर्क तुटेल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर जानेवारी 2019 मधे काम सुरूवात करावयाची होती परंतु ठेकेदाराने कामात दिरंगाई केली असून नवीन रस्ता तर झालाच नाही परंतु जो रस्ता होता त्याच्या दोन्ही बाजूला खोदून ठेवले आहे त्याचबरोबर गावांना जोडणारा नदीवरील मुख्य साकव दुरुस्ती साठी तोडला असल्याने व आता पावसाळा सुरुवात झाल्याने नदीच्या मुख्य प्रवाहामुळे गावांचा संपर्क तुटणार असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. घुम फाटा ते रुद्रवट हा रस्ता तर झालाच नाही शिवाय नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळून साकव तोडून अर्धवट ठेवल्याने तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील मंजूर कामाची ऐशी की तैशी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
  ठेकेदाराने रस्त्याचे अन्य कोणतेही काम न करता पावसाला जवळ येवुन ठेपत असताना आणि कमी अवधी असताना जुने साकव तोडुन नवीन कामाला सुरुवात केली पण हे काम अत्यंत धिम्यागतीने होत असल्यानेरस्ते विकास ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ऐन पावसाळ्यात घुम,रुद्रवट गावांचा तालुका संपर्क तुटणार असल्याने संबंधीत ठेकेदारावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पं.स.सदस्य मधुकर गायकर यांनी खासदार सुनिल तटकरे यांचे कडे कैफियत मांडुन केली आहे तसेच लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनाही कळविले आहे.
पाऊस सुरु होऊन सुद्धा येथील साकवाचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे वरील दोन गावातील लोकांना रहदारीचा दुसरा कोणताच मार्ग नसल्याने त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटणार आहे. परिस्थितीचे गांभीर्याने न घेतल्याने गाव संपर्क तुटण्याला सर्वस्वी जबाबदार कामासाठी नेमलेला ठेकेदार असणार आहे.
घुम, रुद्रवट या दोन्ही गावातील वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी, दैनंदिन कामासाठी प्रवास करणारे प्रवाशी नागरिक यांना या अर्धवट साकवामुळे तसेच रस्त्याचे काम न झाल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. साकव तोडल्यामुळे गावात येणारी एसटी बस मागील कित्येक दिवसांपासून गावात येत नाही त्यामुळे नागरिकांना दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन पायपीट करून दैनंदिन प्रवास करावा लागत आहे. 
अचानक जर जोरात पाऊस कोसळला तर या भागात नागरिकांबरोबर मुक्या जनावरांना देखील नदी ओलांडून जाताना त्रास सहन करावा लागणार आहे.


घुम - रुद्रवट गावांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील मंजूर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही त्याचबरोबर अर्धवट असलेल्या साकवाच्या बाबतीत कल्पना असून ठेकेदाराने उशिरा काम सुरू केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही या साकवाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही ठेकेदाराला सांगितले आहे.
श्री.चंदन मोरे , इंजिनिअर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा