पारंपरिक जलस्रोतावर नागरिकांची भिस्त
तालुका प्रशासनाकडून टँकर व विंधनविहिरी ची तरतूद
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
या वर्षी हवामानातील बदल व समुद्री वादळे यामुळे पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी झाले .पर्यायाने श्रीवर्धन तालुक्याला दुष्काळाची धग सोसावी लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो .आजमितीस धरणातील पाणी साठा
131000000 लिटर
0.131 द. ल. घ. मी. शिल्लक आहे .त्यामुळे श्रीवर्धन नगरपरिषदे कडून एक दिवसा आड पाणी शहरातील नागरिकांना उपलब्ध केले जात आहे.त्यामुळे नागरिकांना पेयजला व्यतिरीक्त इतर पाण्यासाठी नैसर्गिक पारंपारिक जलस्रोत हातपंप , विहिरी ,बोअरवेल ,याचा वापर करावा लागत आहे .श्रीवर्धन शहराची आजची लोकसंख्या 15200 च्या जवळपास आहे .श्रीवर्धन नगरपालिकेच्या हद्दीतील नवी पेठ , मोहल्ला शिवाजी चौक , वाणी आळी ,पेशवे आळी ,महेश्वर पाखाडी ,दाबक पाखाडी ,जीवनेश्वर पाखाडी ,विठ्ठल आळी या सर्व भागात नगरपालिके कडून पाणी पुरवठा केला जातो .रानवली धरणातील पाणी साठा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत समाप्त होण्याची शक्यता आहे .त्या कारणे जनतेला पेयजला साठी टँकर व्यतिरिक्त दुसरा पर्याय उपलब्ध नाही .कारण शहरातील विहिरी मध्ये क्षारांचे प्रमाण आमूलाग्र आहे . क्षार युक्त पाणी आरोग्यासाठी धोकादायक आहे .नगरपालिकेच्या समोर पेयजलच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे . "फनी "वादळामुळे कोकणातील पाऊस लांबणीवर पडल्यास श्रीवर्धन तालुक्याचा पाणी प्रश्न गँभिर रूप धारण करू शकतो .
आजमितीस श्रीवर्धन तालुक्यातील शेखार्डी वादशेतवावे , (बोर्ली )कोंडेपंचतन ,नागलोली या गावांना टँकरने पाणी पुरवठा चालू आहे .तसेच साक्षी भैरी( हरिहरेश्वर ) ,गुलधे ,बापवली ,आदगाव ,व कासारकोंड येथील टँकर चे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत .तालुक्यात 12 विंधनविहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत त्या पैकी 3 पुर्ण झाल्या आहेत तर एक व्यर्थ गेली आहे . कारविणे व कारविणे कोंडा जवळच्या विंधनविहिरी बुधवारी सायंकाळ पर्यंत पूर्णत्वास जातील या पद्धतीने काम चालू आहे . हरिहरेश्वर ला एका खाजगी बोअरवेल ची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून करण्यात आली आहे .
श्रीवर्धन नगरपालिका पाणी प्रश्नी सजग आहे .मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची रानवली धरणाची क्षमता आहे .तसेच आगामी काळात पाणी प्रश्न गंभीर बनून जनतेला त्रास होणार नाही त्या साठी टँकर चा प्रस्ताव तयार आहे .जनतेने नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे .....किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपालिका )
श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला पेयजलाच त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी तालुका प्रशासनाने घेतली आहे .प्रशासनाकडे टँकर संदर्भात आलेल्या मागणी नुसार तात्काळ कार्यवाही करण्यात आली .टँकर ,बोअरवेल याची तरतूद प्रशासनाने केली आहे ......बाळासाहेब भोगे (गटविकास अधिकारी श्रीवर्धन)
या वर्षी पडलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम पर्यटन व्यवसायावर काही प्रमाणात जाणवत आहे . श्रीवर्धन शहरातील लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचे दायित्व नगरपालिका प्रशासन पुर्णपणे यशस्वीपणे पार पाडत आहे .जनतेच्या पाणी प्रश्नी नगरपालिका प्रशासन तत्पर आहे .....वसंत यादव (पर्यटन सभापती श्रीवर्धन नगरपालिका )


إرسال تعليق